अफगाणिस्तान वि श्रीलंका सामन्याची तिकिटविक्री सुरु
पुणे : अफगाणिस्तान (Afghanistan) आणि श्रीलंका (Sri Lanka) विश्वचषकाच्या रोमांचक (World Cup) सामन्यात पुण्यात ३० ऑक्टोबरला (Cricket) एमसीए स्टेडियम इथे भिडणार आहेत आणि त्याची तिकिटविक्री जोरात सुरु आहे.
येत्या काही वर्षात अफगाणिस्तान आणि श्रीलंका ह्यांचातली चुरस शिगेला पोहोचली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे पुण्यात पहिल्यांदा रशिद खान आणि नवीन-उल-हक विरुद्ध कुसाल मेंडिस आणि कुसाल परेरा अशी झुंज बघायला मिळणार आहे. मुख्य म्हणजे, अफगाणिस्तानचा सध्याचा फॉर्म बघता आणि उपांत्य फेरीत पोहोचायची त्यांना असलेली संधी बघता ह्या लढतीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.
ह्या सामन्याचं महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला अपेक्षा आहे कि भारत वि बांगलादेश सामन्याप्रमाणेच ह्या सामन्याला देखील मोठी गर्दी होईल व जी काही तिकिटं शिल्लक आहेत ती प्रेक्षक लवकरात लवकर खरेदी करून पुन्हा एकदा सामन्याला अप्रतिम वातावरण तयार करतील.
सप्टेंबरमध्ये लाहोर येथे श्रीलंका आणि अफगाणिस्तान आशिया कप मध्ये एकमेकांसमोर आले होते आणि तेव्हा अफगाणिस्तानचा थोडक्यात दोन धावांनी पराभव झाला होता. आगामी सामन्यात त्याचा वचपा काढायच्या इराद्याने अफगाणिस्तानचा संघ पुण्यात दाखल झाला आहे. प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट आणि मेंटॉर अजय जडेजा ह्यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान सध्या भलताच फॉर्म मध्ये आहे. त्यांनी नुकतीच जगज्जेते इंग्लंड व शेजारी पाकिस्तान ह्यांना धूळ चारली व आपण कोणत्याही संघापेक्षा कमी नाही हे दाखवून दिलं आहे.
तर दुसरीकडे अजूनही अडखळत असलेल्या परंतु पुण्यात खेळण्याचा पुरेसा अनुभव असलेल्या श्रीलंकेला आशा असेल कि अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयाने त्यांची गाडी रुळावर येईल. आज अफगाणिस्तान संघाने सामन्या अगोदर गहूंजे स्टेडियमवर कसून सराव केला. यावेळी कर्णधार हशमत उल्ला शाहिदी,रशिद खान, नवीन-उल-हक, मुजीब उर रेहमान, नुर अहमद, रेहमानुल्ला गुरबाज, रेहमत शहा, इब्राहिम जद्रान, अली खिल, मोहंमद नबी, नजीब उल्ला जद्रान यांचा समावेश होता.