१९ वर्षाखालील संघाला २५ लाख रुपयाचे पारितोषिक
पुणे - देशांतर्गत क्रिकेट हंगामातील १९ वर्षांखालील गटाची विनू मांकड क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघास महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहिर केले. महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरीच्या जोरावर मुंबईचा ११५ धावांनी पराभव करून सोमवारीच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजेतेपदासाठी मी संपूर्ण संघ, प्रशिक्षक कर्मचारी आणि निवड समितीचे अभिनंदन करतो आणि विजेत्या संघाला २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करतो असे एमसीएचे अध्यक्ष राोहित पवार यांनी सांगितले. नव्या हंगामाची सुरुवात होत असताना आमच्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे.
आम्हाला आशा आहे की काही मुले भविष्यात भारतासाठी खेळतील आणि या हंगामात कामगिरीत सातत्य राखतील, असेही रोहित पवार म्हणाले. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने अर्शीन कुलकर्णीच्या (१०५) शतकी खेळीने महाराष्ट्राने ५० षटकांत ६ बाद ३१६ धावा केल्या. दिग्विजय पाटील (६०), सचिन धस (५२), किरण चोरमले (७४) यांची साथ मिळाली. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला ३५.२ षटकांत २०१ धावांतच रोखले. स्वराज चव्हाणने ४५ धावांत ५ गडी बाद केले. त्याला प्रतिक तिवारीने दोन, तर अर्शीनने एक गडी बाद करून सुरेख खेळी केली. या संघातील अर्षिन कुलक्रणी, सचिन धस, किरण चोरमले, साहिल पारख, सोहन जमाले, अनुराग कवडे आणि दिग्विजय पाटिल यांची १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यासाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे