यजमान इंग्लंडला अल्प आघाडी
#बर्मिंगहॅम
स्टुअर्ट ब्राॅड आाणि ओली राॅबिन्सन या वेगवान गोलंदाजांनी घेतलेल्या प्रत्येकी ३ बळींमुळे ॲॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात यजमान इंग्लंडने ७ धावांची आघाडी घेतली.
इंग्लंडने आपला पहिला डाव ८ बाद ३९३ धावांवर घोषित केल्यानंतर सलामीवीर उस्मान ख्वाजाच्या (१४१) शतकामुळे ऑस्ट्रेलियाने रविवारी (दि. १८) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ११६.१ षटकांत सर्व बाद ३८६ धावा केल्या. इंग्लंडतर्फे अनुभवी फिरकीपटू मोईन अलीने दोन तर जेम्स ॲँडरसन आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेत ब्राॅड-राॅबिन्सन यांना चांगली साथ दिली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद २७ धावा केल्या होत्या.
दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३११ अशा सन्मानजनक धावसंख्येवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित पाच फलंदाजांनी केवळ ७५ धावांची भर घातली. यामुळे पहिल्या डावात आघाडी घेण्याचे पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे इरादे धुळीस मिळाले. ॲॅलेक्स कॅरीने ६६ तर कर्णधार पॅट कमिन्सने ३८ धावांचे योगदान दिले.
वृत्तसंस्था
संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड : पहिला डाव : ८ बाद ३९८ धावांवर घोषित
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : ११६.१ षटकांत सर्व बाद ३८६ (उस्मान ख्वाजा १४१, ॲॅलेक्स कॅरी ६६, ट्रॅव्हिस हेड ५०, पॅट कमिन्स ३८, कॅमेरून ग्रीन ३८, ओली राॅबिन्सन ३/५५, स्टुअर्ट ब्राॅड ३/६८, मोईन अली २/१४७, बेन स्टोक्स १/३३, जेम्स ॲँडरसन १/५३).
इंग्लंड : दुसरा डाव : ८ षटकांत बिनबाद २७ (बेन डकेट खेळत आहे १९, झॅक क्राॅवले खेळत आहे ७).