पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे. काल उशिरा रात्री त्यांनी सोशल मीडियावर राजीनाम्याची प्रत प्रसिद्ध करत हा निर्णय जाहीर केला.
अशोक खरात प्रकरणावरून चाकणकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय टीका आणि चिखलफेक होत होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली होती. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठकही पार पडल्याची माहिती समोर आली होती. अखेर वाढत्या दबावामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही चाकणकर यांच्या राजीनाम्यावर टीका केली. “हा एक ओळीचा राजीनामा असून अनेक महिलांना न्याय मिळाला नाही. कर्माचे फळ भोगावे लागते,” असे त्या म्हणाल्या. याशिवाय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्या रूपाली ठोंबरे यांनीही प्रतिक्रिया देताना चाकणकर यांच्यावर टीका केली. भोंदू बाबा खरात प्रकरणातील पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या बाजूने उभे राहिल्याचा आरोप त्यांनी केला.


