पुणे : महापालिका निवडणुकीतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत व्यापक संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून महानगर प्रमुख आणि शहर प्रमुख या पदानंतरची सर्व पदे तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील संघटना नव्याने उभारण्यासाठी सर्वंकष सर्वेक्षण करण्यात येणार असून वार्ड प्रमुखांपासून उपशहर प्रमुखांपर्यंतची रचना नव्याने निश्चित केली जाणार आहे. शहरात सक्षम आणि प्रभावी कार्यकर्ते तयार करण्यासाठी बैठका घेतल्या जाणार असून त्यानंतर नवी कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असे सामंत यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आलेल्या सुमारे १२० इच्छुकांची स्वतंत्र बैठकही लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट करत, असा प्रश्नच उद्भवत नाही, असे सामंत यांनी नमूद केले. पक्षात एकच गट असून तो म्हणजे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व, असे सांगत त्यांनी गटबाजीच्या चर्चांना दुजोरा दिला नाही. शहरात काही मतभेद असतील, तर ते दूर करून सर्व पदाधिकारी एकत्रितपणे कामाला लागतील, असेही त्यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत बोलताना सामंत यांनी, त्यांच्यावर टीका करणे योग्य नसल्याचे सांगितले. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे नमूद करत, पराभवानंतरही त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शिवसेनेला लक्ष्य केले जात असल्याच्या प्रश्नावर सामंत यांनी, कोणत्याही दबावाला शिवसेना जुमानणार नाही, असे स्पष्ट केले. कोणत्याही व्यक्तीवर पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी काही प्रकरणांमध्ये इतर नेत्यांचाही संदर्भ येत असल्याचे नमूद केले.


