Baramati By-Election 2026 | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवार आता स्वतः ‘अॅक्शन मोड’वर आल्या आहेत. ५३ अर्जांपैकी ५ अर्ज बाद झाल्यानंतर आता सर्व नजरा काँग्रेसच्या भूमिकेकडे लागल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे आमदार रोहित पवार यांनी सकाळी ९.३० च्या सुमारास सर्वोदय आश्रम, मुंबई येथे भेट घेतली. यादरम्यान अजितदादा पवार यांच्या संशयास्पद अपघात प्रकरणी व बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली असल्याचे समोर आले आहे.
काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी – रोहित पवार…
रोहित पवार यांनी देखील या भेटीतील चर्चेच्या तपशीलाबाबत सोशल माध्यमावरून माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “बारामती विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणं ही अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील प्रत्येकाची आणि तमाम बारामतीकरांची इच्छा आहे. अजितदादांची बहुतांश राजकीय कारकिर्द ही काँग्रेसमध्ये आणि नंतर काँग्रेससोबत गेली. या काळात काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध राहिला. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची मुंबईत भेट घेतली आणि अजितदादा, त्यांचं काम आणि त्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध बघता काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती त्यांना केली.
अजितदादांसारख्या एका प्रमुख नेत्याच्या अपघाताचा FIR जर महाराष्ट्रात होत नसेल अशा सरकारविरोधात संघर्ष का करु नये? असा स्पष्ट विचार त्यांनी यावेळी मांडला. त्यांच्या या विचारांचा आणि त्यांच्या पक्षाच्या धोरणाचा आदर आहे. पण तरीही काँग्रेससह अर्ज दाखल केलेल्या इतरही सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेऊन सुनेत्राकाकी यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करावं, अशी माझी या सर्वांना विनंती आहे आणि या विनंतीचा हे सर्वजण आदर ठेवतील, असा विश्वास आहे.
वरिष्ठांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ – हर्षवर्धन सपकाळ
बारामतीतील अर्ज मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय आम्ही पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करूनच घेऊ. भाजप फोन करेल असं वाटतं नाही आणि तशी अपेक्षाही नाही. कोणालाही अडथळा आणण्यासाठी आम्ही मैदानात उतरत नाही, वैचारिक पातळीवर लढणं ही आमची भूमिका आहे. बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने आमच्याशी संपर्क साधलेला नाही.
– हर्षवर्धन सपकाळ (अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी)


