संग्रहित छायाचित्र
नांदेड ; पात्रता नसणाऱ्यांना पक्षाने मोठं केलं. मात्र, त्यांनी पक्षाबरोबर गद्दारी केली. आता त्यांना सोडणार नाही’, असा थेट इशारा नांदेडमधील भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिला आहे. हा इशारा देताना चिखलीकर यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे चिखलीकर यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर त्यांचा रोख असावा असेही बोलले जात आहे.
प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, आपण लोकसभेला अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. एकाही कार्यकर्त्यांच्या संदर्भात माझी वैयक्तिक तक्रार नाही. मात्र, पराभवाची कारणं खूप वेगळी आहेत. अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. त्यावेळी काय चर्चा होती? नांदेडची जागा दोन लाखांनी निवडून येईन. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे यांना राज्यसभेवर घेण्यात आलं. त्यानंतर असं वाटलं की आपलं लीड आणखी वाढेल. पण ही फक्त आपली एक भावना होती.
ते म्हणाले, यामध्ये असं झालं की नगरपालिका आणि महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षांच्या जुन्हा कार्यकर्त्यांना असं वाटलं की अशोक चव्हाण यांच्याबरोबर आलेले लोक आपल्या छातीवर बसतील. मग आपण काम करून काय फायदा? त्यामुळे कदाचित त्यांनी काम केलं नसावं. तसंच अशोक चव्हाण यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना वाटलं असेल की आपलं काही नाही. आपण तर आत्ताच आलो आहोत. यामध्ये नांदेडमध्ये लोकसभेला कमी मतदान झालं, असं माझं मत आहे.
ते म्हणाले, माझा कोणावरही राग नाही. मी कोणावरही राग व्यक्त करणार नाही. एक दोन लोक आहेत, त्यांना शेवटपर्यंत सोडणार नाही. ज्यांची पात्रता नसताना पक्षाने त्यांना मोठं करण्याचं काम केलं. अशा लोकांनी पक्षाशी गद्दारी केली. ही या निवडणुकीतील चुकीची गोष्ट आहे. जय-पराजय सोडून द्या. पण आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले. प्रताप पाटील चिखलीकर यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना एका बैठकीत वरील वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानाचा रोख नेमकं कुणाकडे आहे, याबाबत आता चर्चा रंगल्या आहेत.