Congress,AJit Pawar,Chhagan Bhujbal,Dhananjay
2019 उलटून पाच वर्षे झाली असली तरी पहाटेच्या शपथविधीची चर्चा काही थांबलेली नाही. मंत्री धनंजय मुंडे यांच्या महत्त्वाच्या विधानानंतर आता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना पहाटेच्या शपथविधीच्या पडद्यामागील रंजक कहाणी सांगितली. पहाटेच्या शपथविधीच्या बैठकीदरम्यान शरद पवार रागाने निघून गेले होते तर अजित पवारांनी दांडी मारली होती असा खुलासा भुजबळांनी केला. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
पहाटेची शपथविधी हे षडयंत्र होत असं मंत्री धनंजय मुंडे दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, मग हे षडयंत्र कोणी रचलं? एकतर उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाहीत. काँग्रेस देखील असं षडयंत्र रचू शकत नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी हे षडयंत्र रचलं की भाजपच्या नेत्यांनी रचलं? याची काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं, त्यावेळी बैठक सुरु होती. काँग्रेस, ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या बैठका सुरू असताना काँग्रेसचे नेते खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये थोडासा वाद झाला आणि शरद पवार रागाने निघून गेले.
त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची बैठक सुरु राहिली. पण नंतरच्या बैठकीला अजित पवार नव्हते. पण बैठकीच्या दुसऱ्या दिवशी टीव्ही लावला तेव्हा अजितदादांचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर तातडीनं मी शरद पवारांच्या भेटीला गेलो. तोपर्यंत पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. त्यावेळी जो काही प्रयत्न झालेला आहे, ते होणार नाही याची आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागू या. असं आम्ही ठरवलं.
आम्हाला बैठकीत नेमकं काय घडलं याची काही कल्पना नव्हती. वेळी आम्ही सुद्धा इकडे तिकडे गेलेले आमदार यांना गोळा करायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही अजित पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेलो.
त्यावेळी, पवारांना सांगितलं, तुम्ही असं करू नका परंतु दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निकाल आला. त्या निकालाच्या नंतर देखील आम्ही त्यांना सांगितलं निकालानंतर तुमची पुढची वाटचाल फार कठीण झालेला आहे. तुम्ही हे सगळं सोडून द्या आणि पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे परत या.
त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसची जी मीटिंग झाली, त्याच्यामध्ये सर्व आमदार हजर होते. त्यावेळी मीच ठराव मांडला. ठीक आहे, अजित पवार चुकले असतील. परंतु त्यांना परत आपल्या पक्षांमध्ये घेतलं पाहिजे आणि त्यानंतर अजित पवार यांना मीटिंगमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर त्यांचं सगळ्यांनी स्वागत केलं.
इतकंच नव्हे तर उपमुख्यमंत्री कोणाला करायचं यावेळी सुद्धा सांगितलं होतं अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करा. हे मी सांगितलं. त्यावेळी काहींना वाटत होतं अजित दादा नाहीतर आपण उपमुख्यमंत्री व्हावे, त्यांना थोडासं वाईट वाटलं, त्यांना माझा राग सुद्धा आला होता, परंतु त्यावेळी मला ते योग्य वाटलं म्हणून मी केलं. काल धनंजय मुंडें यांनी जे काही सांगितलं, त्यांचा रोख कोणाकडे होता याची मला काही कल्पना नाही, ते त्यांनाच विचारा असंही पुढे छगन भुजबळ यांनी म्हटल आहे.