देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन दोन महिने होत आले तरी अद्याप ते वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. नेमकं कारण अद्याप समोर आलं नसले तरी, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत एक वेगळेच वळण दिलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्षा बंगल्यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. वर्षा बंगल्यावरील लॉनमध्ये कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांची शिंग पुरलेत असा दावा राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्षा बंगल्याबाबत धक्कादायक विधानं केले आहेत. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
वर्षा बंगल्यावरील लॉनमध्ये बळी दिलेल्या रेड्यांची मंतरलेली शिंग पुरलेत...
वर्षा बंगल्यात कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळे फडणवीस पुन्हा या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नाहीत. मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री तिकडे झोपणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांचे मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेऊन अनेक दिवस उलटले तरी देवेंद्र फडणवीस सागर बंगला सोडून वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपच्या वर्तुळात अशी चर्चा आहे की, वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. मात्र, वर्षा बंगल्यावरील कर्मचारी वर्गात अशी कुजबुज रंगली असल्याचे राऊतांनी म्हटलं आहे.
खळबळजनक दावा करताना राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. शिंदे गटात जे लिंबूसम्राट आहेत त्यांनी उत्तर द्यावे असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंसह नेत्यांना लगावला आहे.