वाढीव दंडाबाबत उपमुख्यमंत्र्यांना साकडे; वाहनचालक, मालकांच्या प्रश्नांवर अजित पवारांनी चालकांशी साधला संवाद
पंकज खोले
फिटनेस प्रमाणपत्र बाबत विलंब शुल्काच्या विरोधात वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्याची भेट घेऊन साकडे घातले. या बाबत सविस्तर माहिती घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही, यासाठी सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी ऑटो, टॅक्सी, बस ट्रान्सफर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आचारसंहितेच्या नियमांचे पालन करून आताच काही निर्णय घेण्यात येतील. अथवा आचारसंहितेनंतर निर्णय घेऊ असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
'सीविक मिरर'च्या माध्यमातून या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबत वाहतूक संघटनेच्या वतीने आभार व्यक्त केली. दरम्यान, पुण्यातील खासगी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित लावली होती. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या व व्यथा मांडल्या. ऑटो, टॅक्सी, बसचालक, मालकांवर अन्याय करणारा निर्णय घेतला आहे. नुकताच फिटनेस प्रमाणपत्र बाबत आरटीओने चुकीचा निर्णय घेतल्याची तक्रार वाहनधारक संघटना करत आहे. उशिरा प्रमाणपत्र घेतल्यास प्रत्येक दिवसाला पन्नास रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना हजारो रुपये दंड होणार आहे. एवढा दंड भरणे कठीण असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा आदेश पारित झालेला आहे. मात्र याबद्दल तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. मुक्त रिक्षा परवाना बंद करण्यात यावा. ओला उबेर या कंपन्यांना प्रशासनाने प्रवासी वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. या प्रश्नासह सर्व इतर विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
फिटनेस प्रमाणपत्राबाबत आरटीओने दिवसाकाठी ५० रुपयांची आकारणी केली आहे. यासह चालक मालकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यावर तोडगा काढण्याच्या मागणी आहे. यावर बैठक बोलावून रितसर मार्ग काढला जाणार आहे. शासनाकडून याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा असल्याचे ऑटो, टॅक्सी, बस ट्रान्सफर फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केली.
सहा तारखेनंतर प्रश्न सोडवू
जे प्रश्न आचारसंहितेच्या मर्यादेमध्ये येत नाहीत असे प्रश्न तातडीने सोडवले जातील. ज्या प्रश्नांना आचारसंहितेची अडचण आहे, त्या प्रश्नांबद्दल सहा तारखेनंतर लक्ष घालून प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले. सहा तारखेनंतर बैठक बोलावली जाईल. त्यामध्ये अडचणींवर तोडगा काढण्याचे अजित पवार यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. दंड का वाढला याची तातडीने दखल घेत माहिती घेतली.