महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा सुरु आहे. असे असतानाच आज (12 जून) मुंबईमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्याची बातमी आहे. मुंबईतील हॉटेल ताज लँड एन्डमध्ये ही भेट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला घोषणेपूर्वीच सुरुंग लागणार का? असा सवाल विचारला जात आहे.
आज सकाळी राज ठाकरे ताज लँडस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर 20 मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या हॉटेलमध्ये पोहोचले. सुरुवातीला हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये एकत्र येणे योगायोग आहे का, अशी चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या नियोजित कार्यक्रमात कुठेही ताज लँडस हॉटेलचा समावेश नव्हता. मात्र, राज ठाकरे या हॉटेलमध्ये आल्यानंतरच देवेंद्र फडणवीस वाट वाकडी करुन याठिकाणी का पोहोचले, असा सवाल आता विचारला जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट निर्णायक ठरणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंचे मनोमिलन होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. ठाकरे गट आणि मनसे पक्षातील पहिल्या ते शेवटच्या फळीतील नेते युतीसाठी सकारात्मक होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज एकत्र येणार आणि राजकारणात मोठे उलटफेर होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व राखून असलेल्या चाणाक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आगामी राजकारणाचे वारे ओळखून योग्यावेळी शिवेसना-मनसे युतीला ब्रेक लावण्यासाठी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी बोलावले असावे का, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.