अजित पवारांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक, पोलिसांनी घेतलं ताब्यात

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनांचे पडसाद आज पुण्यात देखील पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या पुणे येथील एका कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांमधील काही शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणाबद्दल आणि शेतकरी कर्जमाफीबद्दल अजित पवारांकडे न्याय देण्याची मागणी करत गोंधळ घालत घोषणाबाजी केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 14 Jun 2025
  • 03:11 pm

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनांचे पडसाद आज पुण्यात देखील पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या पुणे येथील एका कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांमधील काही शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणाबद्दल आणि शेतकरी कर्जमाफीबद्दल अजित पवारांकडे न्याय देण्याची मागणी करत गोंधळ घालत घोषणाबाजी केली. यावेळी अजित पवार देखील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

आज पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  बच्चू कडूंच्या उपोषण आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला. बच्चू कडू हे उपोषणाला बसलेत, त्यांना रक्ताची उलटी झालीय.. तुम्ही न्याय द्या, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अशी विनंती केली. यावर उत्तर देताना अजित पवारांनी कालच्या बावनकुळे- बच्चू कडू भेटीचा दाखला दिला. परंतु आम्ही कर्जमाफी करतोच असं कोणतेही ठोस असं उत्तर दिले नाही. यानंतर कार्यकर्त्यांनी आणखी प्रश्नाची सरबत्ती केल्यानंतर, घोषणाबाजी केल्यानंतर बस करा आता असं  उत्तर देत सदर कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढण्याच्या सूचना अजित पवारांनी पोलिसाना दिल्या. अजित पवारांच्या आदेशानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आणि कार्यक्रमातून हाकलून लावलं.   

दरम्यान, अजित पवारांनीच सर्वात आधी शेतकरी कर्जमाफी फेटाळून लावली होती. खरं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी आश्वासने महायुती सरकारने दिली होती, त्या सरकारमध्ये अजित पवारही होते. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसताच अजित पवारांची भाषा बदलली. शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं नाही असं उत्तर त्यांनी एका कार्यक्रमात दिले होते. सगळे सोंग करता येते. पण पैशाचा सोंग करता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्चच्या आत पीकविमा भरावा, पुढील २ वर्ष तरी शेतकरी कर्जमाफी देता येणार नाही असं उत्तर अजित पवारांनी यापूर्वी दिले होते. आताही त्यांना कर्जमाफीबद्दल विचारलं असताना घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी कार्यक्रमाच्या बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या.

Share this story

Latest