प्रातिनिधिक छायाचित्र...
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी खटल्यात माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयानं भाजपा नेते नितेश राणेंविरुद्धचं जामीनपात्र वॉरंट रद्द केलंय. संजय राऊत यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानी प्रकरणात मंत्री नितेश राणेंना माझगाव दंडाधिकारी कोर्टानं दिलासा दिलाय. या खटल्याच्या सुनावणीस न्यायालयात उपस्थित न राहण्याबाबत राणेंना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. नितेश राणे हे सध्या कोकणात असल्यानं सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात २ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्याचे आदेश कोर्टानं जारी केले आहेत.
नितेश राणे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देऊनही गेल्या काही सुनावणीत नितेश राणे हे न्यायालयात उपस्थित राहिले नव्हते, याची दखल घेत माझगाव न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी 16 मेच्या सुनावणीत नितेश राणे यांच्या नावानं जामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. या प्रकरणी आज 2 जून रोजी नितेश राणे यांना जातीनं कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले गेले होते. यापूर्वीही खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित न राहिल्याबद्दल न्यायालयाने नितेश राणे यांच्या नावानं जामीनपात्र वॉरंट काढलं होतं.
महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतर नाट्यकाळात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य नितेश राणे यांनी माध्यमांसमोर केलं होतं. मे 2023 दरम्यान केलेल्या वक्तव्यात नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा 'साप' म्हणून उल्लेख केला होता. या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी कोर्टात त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची माझगाव दंडाधिकारी कोर्टात सुनावणी सुरू आहे.