‘मोदी केवळ राहुल गांधींची टिंगल करतात’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आत्तापर्यंत अनेकदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विविध प्रकारे टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही टीका केली आहे. आता मात्र शरद पवार यांनी एका मुलाखतीत राहुल गांधी हे राजकारणाबाबत गंभीर आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त त्यांची टिंगल करत असतात असेही त्यांनी म्हटलं आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 23 May 2024
  • 12:02 pm

संग्रहित छायाचित्र

वेळ आल्यास समविचारी पक्षांना एकत्र आणून आम्ही देशाला स्थिर सरकार देऊ- शरद पवार

नवी दिल्ली/ मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वावर आत्तापर्यंत अनेकदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विविध प्रकारे टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही टीका केली आहे. आता मात्र शरद पवार यांनी एका मुलाखतीत राहुल गांधी हे राजकारणाबाबत गंभीर आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)फक्त त्यांची टिंगल करत असतात असेही त्यांनी म्हटलं आहे. 

प्रशांत कदम यांच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडी आणि लोकसभा निवडणुकीबाबतही भाष्य केलं आहे. एकटे पंतप्रधानच असे आहेत जे राहुल गांधींची टिंगल, टवाळी करतात. त्यांना शहजादे वगैरे म्हणतात. पंतप्रधानांचा हा अपवाद सोडला तर राहुल गांधींकडे बहुसंख्य वर्ग गांभीर्याने पाहतो आहे. ही जमेची बाजू आहे असं म्हणता येईल, असेही पवार म्हणाले. 

निवडणूक निकालात भाजपाला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या तर समविचारी पक्षांना एकत्र आणून आम्ही देशाला एक स्थिर सरकार देण्याचा नक्कीच प्रयत्न करू असे म्हणत पवार म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांपेक्षा कमी जागा मिळतील. महाराष्ट्रातील त्यांच्या जागा कमी होतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मिळून महाराष्ट्रात केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी त्या जागा वाढणार आहेत. २०१९ मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. त्यामध्ये यंदा सुधारणा दिसेल. राजस्थान, गुजरातमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. या दोन्ही राज्यात काँग्रेसला यंदा काही जागा मिळतील. हरियाणा, पंजाब आणि दिल्ली या तिन्ही राज्यातील काँग्रेसच्या स्थितीत तुम्हाला सुधारणा दिसेल. तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये भाजपाचा फारसा प्रभाव नाही, त्यमुळे त्यांना तिथे फारसा वाव असणार नाही.

राहुल गांधी यांचा दृष्टीकोन आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा दृष्टीकोन बदलला असल्याचे सांगून पवार म्हणाले, २०१९ नंतर त्यांनी जी यात्रा काढली, त्याला  नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्याकडे नेतृत्व लगेच जाईल असं नाही. मात्र, एकत्रित काम करता येऊ शकतं. त्यांच्या नेतृत्वाच्या शैलीत काही चांगले बदल झाले आहेत. राहुल गांधींचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक गंभीर झाला आहे. त्यांनी जी पदयात्रा काढली, लोकांच्या भेटी घेतल्या, महिला, तरुण, बेरोजगार, दलित, शेतकरी या सगळ्यांना ते भेटले. यातूनच ते राजकारणाबाबत गंभीर आहे असं दिसते. याआधी ते राजकारणाबाबत गंभीर नाहीत, अशी चर्चा व्हायची.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest