संग्रहित छायाचित्र
महापुरुषांबद्दल विकृत विधान करणाऱ्यांना ठेचायला हवं. तसेच राहुल सोलापूरकरला गोळ्या घालून मारलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर वातावरण तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंगाबद्दल बोलताना त्यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले असा दावा सोलापूरकर यांनी केला होता. दरम्यान त्यांच्या या विधानामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले काय म्हणाले?
छत्रपती शिवरायांनी लोकशाहीचा पाया रचला. त्यांनी कधीही स्वतःच्या कुटुंबापुरता विचार केला नाही. त्या देशातल्या विविध जाती धर्माच्या लोकांना त्यांनी आपलं कुटुंब मानलं. आपल्याला स्वातंत्र्य देखील याच विचारामुळे मिळालं. छत्रपती शिवरायांनी कधीही तत्त्वाशी तडजोड केली नाही. असं असतानाही त्यांच्याबाबत अशी गलिच्छ विधानं केली जातात.
राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाबद्दल बोलताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, माझ्यासोबतच असंख्य शिवप्रेमींना वेदना झाल्या. त्यांनी असे विधान का केलं. राहुल सोलापूरकर कोण आहे? त्यांनी लाच हा शब्द वापरला. जे लोक लाच घेतात त्यांना लाचेपलीकडे काही सुचत नाही. जिभेला हाड नसते हे मला माहिती आहे. पण उचलली जीभ लावली टाळ्याला. अशा लोकांच्या जिभा हसडल्या पाहिजे. जे लोक महापुरुषांच्या बद्दल अशी विधानं करतात, त्या सगळ्यांना जनतेने दिसल तिथे ठेचून मारलं पाहिजे. कारण ही एक विकृती आहे. आणि या विकृतीमध्ये वाढ झाली तर या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जातीधर्मांमध्ये जी निर्माण केली जाते ती अशा विकृत लोकांमुळे केली जाते.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. महापुरुषांबद्दल अशी विधान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. देशद्रोहाच्या कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई व्हावी.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे होण्यास जास्त काळ लागणार नाही. आणि सोलापूरकर यांच्यासारखी विकृत विधाने करणारे लोक हे त्याला कारणीभूत आहे.
यापुढे त्यांचे चित्रपट किंवा जिथे येथे अभिनय करत असतील असे प्रकल्प हाणून पाडले पाहिजे. चित्रपटसृष्टीतील लोकांनी देखील अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे. या लोकांना गाडलं पाहिजे. या लोकांना गाडलं नाही तर या देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे.
मी या प्रकाराचा कठोर शब्दांमध्ये निषेध करतो. खरंतर मला जर विचारलं, तर मला असं वाटतं याला गोळ्या घालून मारला पाहिजे. यालाच नाही तर अशी जे जे लोक असतील त्या सगळ्यांनाच. कुणीही उठायचं आणि बेताल वक्तव्य करायचं. ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी, देशाच्या संरक्षणासाठी, परकीय आक्रमणाला सामोरे जात असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे पुढे गेले. अशा लोकांबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य होत असेल तर याला दुसरा काहीही पर्याय नाही.
जो कोणी महापुरुषांचा अपमान करेन अशा लोकांना ठेचा आणि काढा असंच आवाहन मी करेन.
जर अशा लोकांना आपण वेळीच ठेचलं नाही तर हे लोक इतिहासाला एक वेगळच वळण देण्याचा प्रयत्न करतील.
राहुल सोलापूरकर याचा घरासमोरील पोलीस बंदोबस्त काढून घ्यायला हवा असं देखील खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.