Maharashtra Politics : "केवळ मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं...", रोहिणी खडसेंची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका....

राज्यातील महिलांवर अन्याय आणि अत्याचाराच्या घटना वाढत असून, राज्य सरकारने महिलांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 10 Mar 2025
  • 03:29 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune,

Rohini Khadse criticizes Rupali Chakankar...

पुणे : राज्यातील महिलांवर अन्याय आणि अत्याचाराच्या घटना वाढत असून, राज्य सरकारने महिलांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, पुणे शहरात तरुणी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. काही वर्षांपूर्वी "पुणे तिथे काय उणे" अशी म्हण प्रचलित होती, मात्र आता "पुणे तिथे गुन्हेच गुन्हे" अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आता पुणे शहराचे नाव "गुन्हे" ठेवायला हरकत नाही, असेही त्यांनी म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शक्ती कायदा अमलात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, सध्याच्या सरकारकडून या कायद्याची कोणतीही अंमलबजावणी केली जात नाही. हा कायदा लागू झाल्यास महिलांवरील अत्याचार रोखता येतील आणि न्यायालयात प्रलंबित असलेले गुन्हे मार्गी लागतील. मात्र, सध्याच्या सरकारला महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतेही गांभीर्य नाही. केवळ निवडणुका आल्या की "लाडकी बहिण" योजना आठवते, पण या लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचे काय? असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर महिलांच्या प्रश्नांवर कमी पडत आहेत का, असा प्रश्न विचारल्यावर खडसे म्हणाल्या की, त्या फक्त चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, पण महिलांच्या प्रश्नांवर काहीच करत नाहीत. राज्यभरात घडणाऱ्या घटनांवर त्यांनी कधीही ठोस भूमिका घेतली नाही. काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक विधान केले, त्यावरही चाकणकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

याशिवाय, सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांवर महिलांविरोधातील गुन्हे दाखल आहेत, तरीही त्या या प्रकरणांवर गप्प आहेत आणि राजीनाम्याची मागणी करत नाहीत. त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नसून केवळ सत्ताधारी पक्षाच्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत, अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली. आता या टीकेला रुपाली चाकणकर काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे.

Share this story

Latest