संग्रहित छायाचित्र
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यावर प्रत्युत्तर देताना दमानिया यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं होतं. यादरम्यान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके धनंजय मुंडेंसाठी मैदानात उतरले आहेत. हाके यांनी दमानिया यांच्यावर टिका करत अंजली दमानिया यांचं नाव अंजली दलालिया असायला हवं होतं असं म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांच्या विरोधात षड्यंत्र रचले जात असल्याचं हाके यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
खरं तर अंजलीताई दमानिया यांचं नाव अंजलीताई दलालिया असं ठेवावं. फक्त काहीच नेत्यांची प्रकरणं उकरून काढायची आणि त्यांना राजकारणातून संपवायचं. हा एककलमी कार्यक्रम अंजली दलालिया यांचा आहे. अंजली दमानिया यांनी यापूर्वी उकरून काढलेल्या सगळ्या प्रकरणाचं पुढं काय झालं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना मीडियावर चमकत राहायचं आहे. त्यांना कुणी गांभीर्याने घेऊ नये.
दमानिया यांच्या हेतुवर शंका आहे. महाराष्ट्रात अनेक प्रकरण आहेत. मात्र दमानिया या ठराविक प्रकरणांमध्येच आवाज उठवतात.
ओबीसी मंत्र्याला कुणी मीडिया ट्रायल द्वारे जर कोणी धोका पोचवण्याचा कार्यक्रम करत असेल तर महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना संरक्षण देईल. ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसी मंत्री मंत्रीमंडळात असणे गरजेचे आहे. धनंजय मुंडे यांच्या मागे ओबीसी समाज उभा आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारणासाठी भांडवल केलं गेलं. धनंजय देशमुख यांची सुरुवातीपासून समतोल भूमिका आहे. पण या धनंजय देशमुख यांनी जरांगेंच्या नादी लागू नये. जरांगे हे दोन तीन वर्षांपासून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेले आहे. त्यामुळे देशमुख यांनी त्यांचा लढा लढावा. त्यांच्या भूमिकेचं आम्ही पहिल्या दिवसापासून स्वागत केलेलं आहे. जरांगेंच्या नादी धनंजय देशमुख लागले तर दुर्दैवाने या घटनेचे गांभीर्य कमी होऊ शकते.