प्रातिनिधिक छायाचित्र....
कोल्हापूर | राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. या मुद्यावरून विरोधकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. बाधित शेतकऱ्यांनी आंदोलने केली. या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये शक्तिपीठाला विरोध असल्याचे सांगत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर समर्थक शेतकऱ्यांच्या मेळ्याव्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. कोल्हापूरकर कधीही आडमुठी भूमिका घेत नाहीत. पण काही राजकीय बाधित नेते शक्तीपीठाला विरोध करतात, असा टोला लगावला आहे. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक आणि मोठ्या संख्येने महामार्ग समर्थक शेतकरी उपस्थित होते.
पडळकर म्हणाले, कोल्हापूरकर कधीच आडमुठी भूमिका घेत नाहीत, याचे प्रत्यय आज आले. आज मेळाव्याला शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांनी त्यांचा महामार्गाला कोणताच विरोध नसल्याचे दाखवून दिले आहे. याआधीही कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशेहून अधिक शेतकरी विमानतळावर मुख्यमंत्र्यांना भेटले होते. पण फक्त काही राजकीय बाधित शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत असल्याची टीका पडळकर यांनी महामार्गाला विरोध करणाऱ्या नेत्यांवर केली.
सतेज पाटील एकाकी
कोल्हापुरमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून त्याला महाविकास आघाडीसह सत्तेतील काही आमदारांनी केला आहे. याच आजी-माजी पालकमंत्र्यांचाही समावेश होता. पण आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी माघार घेत आपला महामार्गाला वैयक्तिक विरोध नसल्याचे म्हटलं आहे. यामुळे आता सतेज पाटील एकाकी पडण्याची शक्यता आहे. अशातच शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर सोडून ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे समर्थन दिल्याची माहिती पडळकर यांनी दिली आहे. काही लोकांचा या महामार्गाला विरोध आहे. मात्र येथील बहुतांश शेतकऱ्यांचे या महामार्गाला समर्थन असल्याचे आता समोर आले आहे. त्यावेळी उच्चांकी दर दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता कोल्हापूरकरांनीच महामार्ग मनावर घेतला असून आता विरोधात कोण जाऊ शकतो? हा मेळावा झाल्यानंतर जे शेतकरी विरोधात आहेत ते देखील आपल्याबरोबर येतील. पण निवडणुकीत ज्या नेत्यांनी विरोधात भूमिका घेतली ते आज महामार्गाच्या समर्थनार्थ एकत्र आले आहेत. त्यांनी माघार घेतली आहे. यावरून आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे पण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दोन पाऊल मागे आले तर काय बिघडले, असा सवाल पडळकर यांनी मुश्रीफ यांनी घेतलेल्या युटर्नवर प्रतिक्रिया दिली आहे.