मी बीडची कन्या; मला पालकमंत्री केलं असतं तर बरं झालं असतं: पंकजा मुंडे
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात हत्या झाली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात अटक झाली. त्यानंतर या प्रश्नावरुन राजकारण चांगलंच रंगलं. सुरवातीला बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे की पंकजा मुंडे अशी चर्चा रंगली होती. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर दोघा बहीण भावांचा पत्ता कट झाला. आणि बीडच्या पालकमंत्री पदाची माळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळ्यात पडली.
दरम्यान, भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आता मला बीडचं पालकमंत्री केलं असतं तर बरं झालं असतं असं म्हटलं आहे. त्या नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.
मुंडे म्हणाल्या, या विषयावर मी माध्यमांशी याधीच बोललेली आहे. मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. जालन्यातून चांगला प्रतिसाद येत आहे. लोक उत्साहात आहे. मला मिळालेली प्रत्येक संधी माझ्यासाठी मिळालेला अनुभव म्हणून मी घेत असते. प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही. मी पाच वर्षे कुठल्याही संविधानिक पदावर न राहता संघटनेचं काम केलं.
बीडच्या पालकमंत्री पदाबद्दल बोलताना मुंडे म्हणाल्या, मी बीडची लेक आहे. बीडची सेवा करण्याची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. माझा पाच वर्षांचा कार्यकाळ हा बीड साठी सर्वात जास्त विकसनशील कार्यकाळ राहिलेला आहे. हे कोणत्याही विचारचा व्यक्ति मान्य करेन.
मात्र आता जे निर्णय झालेले आहे. त्या निर्णयाबद्दल कुठलीही असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेत मी आहे. मला डबल लक्ष द्यावे लागेल. बीडचे पालकमंत्री अजित दादा आहेतच. संघटना, पक्ष, कार्यकर्ते, जनता यांना सांभाळत असताना अजित दादा पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.