Suresh Dhas Speech: फडणवीस हे 'देवेंद्र बाहुबली'; सुरेश धसांची मुख्यमंत्र्यांसमोर तुफान फटकेबाजी

भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘देवेंद्र बाहुबली’ असा उल्लेख करत, आमच्या सर्व अपेक्षा फडणवीस यांच्याकडूनच असल्याचे म्हटले

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Wed, 5 Feb 2025
  • 12:08 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

Suresh Dhas Speech| बीड जिल्ह्यातील आष्टी येथे बहुप्रतिक्षित उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खुंटेफळ साठवण तलावाच्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाइन कामाची पाहणी व बोगदा कामाचे भूमिपूजन तसेच श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) येथे समाधी मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘देवेंद्र बाहुबली’ (Devendra Bahubali) असा उल्लेख करत, आमच्या सर्व अपेक्षा फडणवीस यांच्याकडूनच असल्याचे म्हटले.

आष्टी तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस सुरुवातीला विरोध झाला होता, मात्र नागरिकांचे मन वळवून हा प्रकल्प मार्गी लावला, असे सुरेश धस यांनी सांगितले. या योजनेसाठी रामदास कदम, प्रवीण दरेकर, खासदार प्रीतम मुंडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची मदत केल्याचेही त्यांनी नमूद केले.

धस म्हणाले, 2014 मध्ये मी निवडणुकीत पराभूत झालो, तेव्हा या प्रकल्पाचे फक्त 2 टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र, आमदार झाल्यानंतर 23 टक्के काम झाले. यासाठी फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री असताना एका दिवसात पंपींग मशिनरीसाठी परवानगी दिली आणि त्यामुळेच हा प्रकल्प शक्य झाला.

मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाण्याची मागणी
बीड जिल्ह्यासाठी अतिरिक्त पाणी मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना धस म्हणाले, 23.66 टीएमसी पैकी  7 टीएमसी पाणी मराठवाड्यास मिळाले आहे. त्यातील 1.68 टीएमसी आमच्याकडे आले, मात्र अजून 7 टीएमसी पाणी तिकडेच अडकले आहे. जर हे आणि अतिरिक्त 9.66 टीएमसी पाणी मिळाले, तर बीड जिल्हा,बीडमधील आष्टी तालुका धाराशीवच्या पाच तालुक्यांचा पाणीप्रश्न कायमचा मिटेल.

मुख्यमंत्री फडणवीस हेच मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत, असे सांगताना धस म्हणाले, आम्हाला फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबली यांच्याकडूनच अपेक्षा आहेत. तसेच, त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत, ठराविक नेत्यांच्या पाठिंब्यामुळेच जिल्ह्यात गुंडगिरीला चालना मिळाली होती. मात्र संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी घेतलेली कणखर भूमिका सर्वांना आवडली. या प्रकरणात कोणाला सोडणार नाही, या त्यांच्या वक्तव्यावर सर्व जनतेचा विश्वास असल्याचे धस यांनी म्हटले. 

देवेंद्र फडणवीस यांनी मला भरपूर काही दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे कायम राहील असे म्हणत धस यांनी "दीवार" चित्रपटातील संवादाचा संदर्भ घेत "लोक विचारतात, तुझ्याकडे काय आहे? पण, 'मेरे पास देवेंद्र फडणवीस है'," असे भावनिक उद्गार काढले.

2019 च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळूनही फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत, याचा उल्लेख करत धस म्हणाले,  जनादेश पहाटेच चोरून नेला गेला. तुमच्या विरोधात राजकीय आणि कौटुंबिक पातळीवर कटकारस्थान रचले गेले, मात्र तुम्ही संघर्ष करून दाखवला. तुम्हीच खरे बिनजोड पैलवान आहात, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांचे कौतुक केले.

2019 नंतर माझ्यावर आणि कुटुंबावर राजकीय कटकारस्थान केले गेले, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून न्याय दिला, असेही धस यांनी सांगितले.

Share this story

Latest