Eknath Shinde
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळा आयोजनाची बैठक मुंबईमध्ये घेतली होती. मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमंत्रण असतानादेखील गैरहजर राहिले. दरम्यान, आज मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीकडे पाठ दाखवत शिंदे थेट कुंभमेळ्याच्या तयारीासाठी नाशिकला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मधली दरी वाढत चालली आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याची आढावा बैठक सह्याद्री वरती घेतली होती. एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री आहेत आणि या आढावा बैठकीमध्ये महानगरपालिकचे अधिकारी होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विभागाची आढावा बैठक होती. मात्र, या बैठकीला त्यांनी अनुपस्थिती दर्शवत मलंगडच्या कार्यक्रमाला हाजेरी लावली. अशातच, आता दोन दिवसानंतर एकनाथ शिंदे नाशिक मध्ये जाऊन कुंभमेळ्याची आढावा बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र को-ऑर्डिनेशन रुम स्थापन केली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदेंची ही भूमिका पाहाता राजकीय वर्तुळात शिंदेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे? असं अनेक सवाल उपस्थित होताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचं सत्ता स्थापन झाल्यापासून शिंदे आणि फडणवीस यांच्या कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा सातत्याने ऐकायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे यांनी फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बहुतांश बैठकीला गैरहजेरी लावली आहे. अशातच पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज होऊन गावी गेले होते. त्यामुळं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली.