संग्रहित छायाचित्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांची काल (मंगळवार) रात्री अचानक भेट झाली. मुंबईतील सागर बंगल्यावर ही भेट झाली. या भेटीच्या वेळी इतर महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. फडणवीस आणि खडसे यांच्यातील वादावर आता पडदा पडणार काय? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. मात्र, मतदारसंघातील काही प्रश्नांच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे खडसे यांनी सांगितले होते.
मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपामध्ये जातील अशी चर्चा होती. तसे संकेत त्यांनी स्वत:च दिले होते. मात्र पक्षप्रवेश लांबणीवर पडत असल्यामुळे खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली होती. दरम्यान, मंगळवारी रात्री झालेल्या भेटीनंतर फडणवीस-खडसे वाद मिटणार असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ खडसे काय म्हणाले?
एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना खडसे यांनी मतदारसंघातील काही प्रश्नांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले. खडसे म्हणाले, मतदारसंघातील विविध विकास कामांचं निवेदन मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. त्या निवेदनावर त्यांनी अनुकूल असे शेरे मारलेले आहेत. त्यामध्ये सहकारी सुत गिरणी, मुक्ताबाई मंदिराचा विकास, तसेच अल्पसंख्यांकांचे इंजिनियरिंग कॉलेज असे अनेक विषय त्यामध्ये होते. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर अनुकूलता दाखवली आहे.
ते पुढे म्हणाले, ही पूर्वनियोजित भेट होती. त्यांना मी आधी वेळ मागितली. त्यांनी दिलेल्या वेळेनुसार एक तास मी त्यांना भेटायला गेलो होती. या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. विकासकामांच्या पलीकडे कोणतेही विषय चर्चेला नव्हते.
भाजपा प्रवेशाबद्दल खडसे म्हणाले, असा कोणताही विचार सध्यातरी नाही. याविषयी कोणतीही राजकीय चर्चा सध्या तरी नाही. भाजपा प्रवेशाबद्दल ज्या चर्चा आहे त्या निव्वळ अफवा आहे. राष्ट्रवादीतून भाजपामध्ये जाण्याच्या चर्चा निरर्थक असल्याचे त्यांनी म्हटले.