संग्रहीत छायाचित्र
बीड - संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडवरून धनंजय मुंडेवर भाजपचे आमदार सुरेश धस सातत्यांने आरोप करत आहेत. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला आहे. त्यानंतर सुरेश धस यांनी मुंडेंच्या मातोश्री शेतावरील घरावर का रहायला गेल्या? असा आरोप केला होता. त्यावर धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांचे खंडन केले आहे. मुंडे परिवाराच्या बदनामीसाठी प्रयत्न करणारे सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत, त्यांच्या खोक्याचा आका कोण आहे, याची चौकशी करून सुरेश धस यांनासुद्धा सहआरोपी करण्याची मागणी अजय मुंडेंनी केली आहे.
मागील दोन दिवसांपासून सुरेश धस यांची मुलाखत पाहात आहे. त्यात धनंजय मुंडे यांच्या आईबद्दल ते बोलत आहेत.आमच्या बाई (धनंजय यांच्या आई) परळीला राहात होत्या. मात्र आता त्या गावी राहात आहेत. धनंजय मुंडे त्यांच्या आईसोबतच राहतात. धस यांच्या आरोपांना अर्थ नाही. मुंडे परिवाराला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता ते आमच्या बाईविषयी बोलले आहेत. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. मात्र धस यांचे निराधार आरोप आम्ही का सहन करायचे? धनंजय मुंडे यांचे नेतृत्व घडायला २० वर्षे लागली आहेत. त्यांच्यावर आरोप नसताना त्यांना बदनाम केले जात आहे. ते अनेक आजाराला सामोरे जात आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत. आमच्या परळीच्या घराचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांची आई गावाला जाऊन राहत आहे. गावाकडे राहणे गुन्हा आहे का, असा सवालही अजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
भाऊ-बहीण मंत्री झाल्याने पोटदुखी
सुरेश धस यांचा जावई शोधा. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्ही बोलत नाही. सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे. त्या खोक्याचा आका नक्की कोण आहे. सुरेश धसांना खोक्या प्रकरणात सह-आरोपी केले पाहिजे. आमच्यावर आता कौटुंबिक आरोप केले जात आहेत. मात्र त्याला काही अर्थ नाही. कोणी तरी बोलले पाहिजे म्हणून मी इथे बोलायला आलो आहे. आरोपपत्र आम्ही पूर्ण वाचले नाही. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना कडक शासन झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. धनंजय मुंडे यांनी २०-२५ वर्षे खस्ता खालल्या आहेत. आज दोघे बहिण-भाऊ मंत्री झाले असल्यामुळे विरोधकांना पोटदुखी सुरु झाली. त्यांना बदनाम केले जात आहे. त्यांची प्रकृती वाईट असून ते अनेक आजारांना सामोरे जात आहेत, पण आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्यावर कोणीही नाराज नाही.