संग्रहित छायाचित्र
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. सकाळीच मुख्यमंत्री फडणवीस शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
शिवाजी पार्कवरील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच राज ठाकरेंच्या भेटीसाठी जाणे ही राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब मानली जात आहे.आज सकाळी ९.३० च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवसस्थानी दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपा नेते मोहित कंबोज उपस्थित होते. तर शिवतीर्थावर फडणवीस यांच्या स्वागतावेळी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे मनसेचे नेते उपस्थित होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमापूर्वीच त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने त्यांच्या चर्चेचा विषय काय होता, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीत महापालिका निवडणुका, आगामी राजकीय समीकरणे आणि संभाव्य युती यासंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट महत्वाची मानली जात आहे. या निवडणुकीमध्ये भाजप मनसेला सोबत घेऊन जाणार का? मनसे भाजपला पाठिंबा देते का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.