युद्ध थांबवू शकतात पण पेपरफुटी नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींची टीका

राष्ट्रीय पात्रता-प्रवेश परीक्षेमध्ये देशभरात जो गोंधळ पाहायला मिळाला, त्यावरून आता नीट परीक्षा देणारे विद्यार्थी देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या विषयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Fri, 21 Jun 2024
  • 01:09 pm
Political News

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता-प्रवेश परीक्षेमध्ये देशभरात जो गोंधळ पाहायला मिळाला, त्यावरून आता नीट परीक्षा देणारे विद्यार्थी देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या विषयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात, पण काही कारणांमुळे ते भारतातील पेपरफुटी थांबवू शकत नाहीत.

राहुल गांधी पुढे म्हणाले, भाजपकडून शैक्षणिक क्षेत्र ताब्यात घेतल्यामुळेच पेपरफुटी प्रकरणे घडत आहेत. आतापर्यंत पेपरफुटीची प्रकरणे थांबण्याऐवजी ती वाढतच आहेत. भाजपाने शैक्षणिक संस्थांवर आपल्या विचारांचे लोक नियुक्त केले आहेत. पेपरफुटीवर या लोकांकडून कार्यवाही होण्याची गरज होती, मात्र त्यांनी काहीच केले नाही. सुमार लोक शैक्षणिक संस्थांवर नेमल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे. एक परीक्षा रद्द झाली आहे. पुढची परीक्षा होणार की नाही? याची कल्पना नाही. या पेपरफुटीसाठी जे जे लोक जबाबदार आहेत, त्यांना अटक करून कारवाई केली गेली पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.

नरेंद्र मोदी नावाच्या संकल्पनेची गुजरात मॉडेलपासून सुरुवात झाली. हजारो कोटी रुपये खर्च करून मार्केटिंग करणे आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून भीती निर्माण करणे, अशी ही संकल्पना होती. पण आता देशात कुणी मोदींना घाबरत नाही. जी ५६ इंचाची छाती होती, ती आता ३०-३२ वर आली आहे. याचा मानसिक परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होणार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. मोदींची भीती नष्ट झाल्यामुळेच वाराणसीमध्ये त्यांच्या ताफ्यावर कुणीतरी चप्पल फेकली. याचा अर्थ मोदींची आता भीती राहिली नाही. देशातील विरोधकांनी मोदींच्या प्रतिमेला तडा दिला. त्यामुळे मोदींची भीती राहिली नाही. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा स्वभाव सर्वांना आवडणारा होता. अशा कठीण प्रसंगातून त्यांनी नक्कीच वाट काढली असती. पण नरेंद्र मोदींची शैली अशी आहे की, ते कुणाचे ऐकून घेत नाहीत. माझा मार्ग हाच सर्वोत्तम महामार्ग अशी त्यांची हेकेखोर वृत्ती असते. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत त्यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत, असे सुतोवाच राहुल गांधी यांनी केले.

एनडीएचे खासदार आमच्या संपर्कात
एनडीएचे अनेक खासदार आमच्या संपर्कात असून एका छोट्या चुकीमुळे एनडीए सरकार कोसळू शकते, असा दावा राहुल गांधींनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. सरकारमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. छोट्या चुकीमुळे एनडीए सरकार कोसळू शकते. २०२४ मध्ये भाजपला अपेक्षित निकाल लागला नाही. पूर्ण बहुमतासाठी भाजपला मित्र पक्षांचा पाठिंबा मागावा लागला. अशा स्थितीत एनडीए सरकारला पुढे जाण्यासाठी अनेक संघर्षांचा सामना करावा लागेल, असा दावा करतानाच राहुल गांधींनी काही खासदार आमच्या संपर्कात असल्याचेही नमूद केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest