महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई मध्ये सुरू झाले आहे. मविआ मध्ये विरोधी पक्ष नेत्यावरून रस्सीखेच सुरू असतानाच ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत त्यासंदर्भात पत्र दिले आहे.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपादासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचं नाव देखील आघाडीवर होतं. पण उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना संधी न देता भास्कर जाधव यांना दिली आहे.
भास्कर जाधव हे एक आक्रमक नेते आहेत. त्यांचा अनुभव देखील मोठा आहे, महाविकास आघाडीचं प्रतिनिधत्व करताना ते आपले मुद्दे अधिक आक्रमकपणे सभागृहात मांडू शकतात.
महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते भास्कर जाधव ह्यांची नियुक्ती करण्याची शिफारस पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. pic.twitter.com/NsVAHoVmCa
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 4, 2025
भास्कर जाधव यांची राजकीय कारकीर्द
भास्कर जाधव हे ठाकरेंचे कोकणातील आमदार आहेत. ते कोकणात गुहागर विधानसभा मतदार संघांचं प्रतिनिधित्त्व करतात. ते सहा वेळेस निवडून आलेले आमदार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा तो आक्रमक चेहरा आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकीर्द सुरु करणारे भास्कर जाधव हे 2009-14 दरम्यान राज्यमंत्रीही होते.
सध्या कोकणात एकनाथ शिंदे यांचा पक्ष मजबूत होत असताना ठाकरेंनी कोकणातल्या आपाल्या एकमेव आमदाराला विरोधीपक्ष नेते पद देत त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
मविआमध्ये ठाकरेंचा पक्ष मोठा
मविआमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे सर्वाधिक 20 जागा असल्याने विरोधी पक्षनेते पद शिवसेना ठाकरे गटाने घेतले आहे. विरोधीपक्षनेते पद मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या 28 जागांचा टप्पा महाविकासआघाडीतील एकाही पक्षाला ओलांडता आला नाही. मविआमध्ये ठाकरे गटाने 20 जागा जिंकून मोठा पक्ष ठरला. त्यामुळं सुरुवातीपासून या पदावर ठाकरे गटाने दावा केला होता. अखेर या पदासाठी ज्येष्ठ आमदाराची निवड करण्यात आली आहे.