Ajit Pawar announces Sanjay Khodke candidacy from NCP vidhan parishad candidate list mlc election, MLC Elections
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी विदर्भातल्या बड्या नेत्याला संधी देण्यात आली आहे. संजय खोडके हे अमरावतीचे असून अजितदादांचे निकवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, काही काळ त्यांनी अजितदादांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केलं आहे.
राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी अनेक नावांची चर्चा होती. झिशान सिद्दकी, संजय दौंड, उमेश पाटील, संजय शिंदे, दिपक मानकर, संग्राम कोते पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, चर्चेतील नावे मागे टाकत अजित पवार यांनी संजय खोडके यांना उमेदवारी दिली आहे.
तर संजय खोडके नेमकं आहेत तरी कोण?
गेली अनेक वर्ष संजय खोडके हे अजित पवार यांच्यासोबत काम करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील राजकारणार खोडके गटाचे वर्चस्व आहे. त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या 2004 मध्ये बडनेरा विधासभा मतदारसंघातून आमदार होत्या.
तसेच, 2019 मध्ये खोडके हे लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादीने नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अमरावतीमध्ये उमेदवार नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीतून सुलभा खोडके यांना आयात करून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी भाजपच्या सुनील देशमुख यांचा पराभव करत सुलभा खोडके विजयी झाल्या होत्या. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुलभा खोडके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना राष्ट्रवादीने प्रवेशानंतर अवघ्या 10 मिनिटात उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळी त्या तिसऱ्यांदा निवडून आल्या.
आता संजय खोडके यांना अजित पवार यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात आता अजित पवार आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे.