शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच सातबारा कोरा करण्यासह इतर काही मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असताना आज बच्चू कडूंच्या २५ हून अधिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेत थेट टेलिफोन टॉवरवर चढून आंदोलन केले. ,
दरम्यान, बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केलेल्या बच्चू कडूंच्या काल बीपी कमी झाल्यानंतर डॉक्टरांची टीम तातडीने उपोषणस्थळी दाखल झाली आणि त्यांनी उपचार करण्यास सुरुवात केली मात्र, बच्चू कडू यांनी कोणताही उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मी कोणतेही उपचार घेणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे.
आज सकाळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी सुरु केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्रित झाले. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. तरी देखील आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांच्या २५ हून अधिक कार्यकर्त्यांनी थेट टेलिफोन टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून सुरु केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
टेलिफोन टॉवरवर चढून आंदोलन सुरु केलेल्या बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी जोपर्यंत पूर्ण मागण्या शासनाकडून केल्या जात नाहीत तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचा पावित्रा घेतला आहे.
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आतापर्यंत शेतकरी नेते राकेश टिकैत, कराळे मास्टर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. तर आझाद समाज पार्टीने बच्चू कडू यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.