महाष्ट्रात एकिकडे महापालिकेचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. अशातच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का देत सात विद्यमान खासदारांनी पक्षाला राम राम ठोकला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर, नागालँड युनिटने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. दरम्यान, नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार शनिवारी सत्ताधारी एनडीपीपीमध्ये सामील झाले. त्यामुळ अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत, एनडीपीपी आणि त्यांच्या मित्रपक्ष भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष बनला. मात्र, आता सात आमदारांनी एनडीपीपी मध्ये विलिनीकरण केल्यामुळं नागालँडमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
विधानसभा अध्यक्ष शारिंगैन लोंगकुमेर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व सात आमदारांनी स्वतः हजर राहून एनडीपीपीमध्ये विलीन होण्याचा निर्णय सांगणारी औपचारिक पत्रे सादर केली. हे विलीनीकरण संविधानाच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत संवैधानिक आवश्यकता पूर्ण करते. असं त्यांनी यावेळी सांगितलं.
सात आमदारांवर होणार कारवाई?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागालँडमधील सर्व आमदारांनी एनडीपीपीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली असून सध्या पक्षाकडून पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कशा प्रकारे या आमदारांवर कारवाई करता येईल याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय मुख्यप्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत स्थानिक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेल्या जनादेशाचा हा अपमान असून लवकरच आम्ही त्यांची बाजू समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कायदेशीर पातळीवर आणि राजकीय पातळीवर आम्ही याप्रकरणी लढाई लढणार आहोत. असं श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे.
नागालँड विधानसभा सदस्य (पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रता) नियम, २०१९ नुसार, सभापतींनी विलीनीकरणाला मान्यता दिली आणि त्यानुसार पक्ष संलग्नता नोंदी अद्यतनित करण्याचे निर्देश विधानसभा सचिवालयाला दिले, असे आदेशात म्हटले आहे.
ज्यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ६०सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे. या विलीनीकरणामुळे, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी च्या आमदारांची संख्या २५ वरून ३२ झाली आहे.