मुंबई : राज्यात १४५ नोंदणीकृत पक्ष आणि ६ राष्ट्रीय आणि ४ राज्यस्तरीय पक्ष असतानाही गेल्या २४ वर्षांत कुठल्याही पक्षाने २८८ जागा लढवलेल्या नाहीत. सर्वात सक्षम असलेल्या काँग्रेसने १९७८ पासून कधीच २८८ जागांवर उमेदवार उभे केलेले नाहीत. तोच किस्सा अन्य पक्षांनीही गिरवल्याचे दिसून येते.
या निवडणुकीत काँग्रेस (Congress), भाजप (BJP), आप, सीपीआय (एम), बीएसपी, नॅशनल पीपल पार्टी (एनपीपी) या राष्ट्रीय पक्षाचा आणि मनसे, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पाच राज्यस्तरीय पक्षांचा समावेश आहे. दुसरीकडे देशभरात २ हजार ७६३ नोंदणीकृत पक्ष असून ६ राष्ट्रीय पक्ष आणि ५८ राज्यस्तरीय पक्षांची नोंद निवडणूक आयोगाकडे आहे.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ९ कोटी ६३ लाख मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ४ कोटी ९७ लाख पुरुष आणि ४ कोटी ६६ लाख स्त्री मतदार आहेत. १ लाख १८६ मतदान केंद्र असून त्यामध्ये सर्वाधिक ५७ हजार ५८२ मतदान केंद्र हे ग्रामीण भागात आहेत. ४२ हजार ६०४ मतदार हे शहरी भागातील आहेत. तब्बल १ कोटी ५५ लाख तरुण मतदार २० ते २९ वयोगटातील असून २० लाख ९३ हजार मतदार हे पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र राज्यातील एकही राजकीय पक्ष असा नाही जो सर्वच्या सर्व २८८ विधानसभेच्या जागा लढवित आहे. सत्तेसाठी बनलेल्या आघाड्या व युती तसेच पराभूत होण्याच्या भीतीने एकाही राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाने २८८ जागांवर निवडणूक लढविण्याचे धारिष्ट्य दाखविलेले नाही. काँग्रेसने १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २८७ जागा लढविल्या होत्या. १९९० मध्ये २७६ जागा लढविल्या.
आणीबाणीनंतर १९७८ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २५९ जागा तर जनता पार्टीने २१५ जागांवर उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर १९९९ मध्ये सर्वाधिक २२३ जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजप आणि शिवसेनेनेही कधीच दोनशेचा आकडा पार केलेला नाही. स्वबळाचा नारा देणाऱ्या मनसेने २०१४ मध्ये सर्वाधिक २१९ जागांवर उमेदवार उभे केले होते. एकंदरीत आघाड्या आणि युतीमुळे गेल्या ४६ वर्षांपासून एकाही पक्षाने २८८ जागा लढवलेल्या नाहीत.