Advertisement

ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके आहेत तरी कोण?

मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना स.का. पाटील यांच्या नावाचा उल्लेख केला.

हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर शिवसेना आणि मनसेच्यावतीने मुंबईत विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील वरळी येथील डोम सभागृहात या विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना स.का. पाटील यांच्या नावाचा उल्लेख केला. त्याच्या भाषणानंतर स.का. पाटील कोण होते असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

भाषणात उद्धव ठाकरेंनी केला स.का. पाटलांचा उल्लेख

जर महाराष्ट्रात एखाद मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर हो आम्ही गुंड आहोत. देवेंद्र फडणवीस यांचे हे विधान मला काँग्रेस सत्तेत असतानाच्या स.का. पाटील यांची आठवण करुन देते. मुंबई आमची आहे. आम्ही लढलो आणि ती आम्ही साध्य केली. हिदीं लादली जात आहे, आम्ही हे होऊ देणार नाही. अस म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार टीका केली.

त्यांच्या या भाषणानंतर उपस्थित मंडळींमध्ये स. का. पाटील कोण आहेत? उद्धव ठाकरेंनी त्यांची आठवण का काढली? संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्यात त्यांची भूमिका काय होती? असे अनेक प्रश्न उपस्थित होते आहेत. तर जाणून घेऊयात कोण होते हे पाटील?

सदाशिव कानोजी पाटील अर्थात स. का. पाटील. रत्नागिरी आणि आताच्या सिंधुदुर्गातील पाट नावाच्या गावात स. का. पाटलांचा जन्म झाला. हे गाव आताच्या कुडाळ तालुक्यात आहे. दोन बहिणी आणि दोन भाऊ अशी स. का. पाटलांची भावंडं. ते कुडाळदेशकर ब्राह्मण कुटुंबातील होते. स. का. पाटील १० वर्षांचे असतानाच पितृछत्र हरपलं. वडिलांचाच आधार गेल्यानं ज्या खाचखळग्यांना सामोरं जावं लागणार होतं, त्या प्रत्येक संकटाला ते सामोरे गेले.

शिक्षणासाठी मोठी पायपीट करावी लागली. गावी शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आले. त्यानंतर त्यांच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली. 

तर स. का. पाटलांची राजकारणात एन्ट्री कशी?

१९१८ च्या दरम्यानचा काळात मुंबईतल्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकत असतानाच, भारतासह जगभरात इन्फ्लुएन्झा साथीनं धुमाकूळ घातला होता. याचा फटका पाटलांनादेखील बसला. कॉलेज सोडून गावी निघून गेले. गावी जाऊन मालवण पालिकेत काम करू लागले. साथ गेल्यानंतर ते पुन्हा मुंबईत आले आणि झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अर्धवेळ काम करून तिथं ते शिकू लागले.

याच काळात त्यांची भेट महात्मा गांधींसोबत झाली. त्यावेळच्या प्रसिद्ध नागपूर परिषदेनंतर गांधींनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागाचं आवाहन केलं आणि गांधींमुळे भारावलेल्या स. का. पाटलांनी कॉलेजला राम राम ठोकला. गांधीजींच्या असहकार चळवळीच्या विद्यार्थ्यांच्या सभांसाठी ते संयोजक बनले. स. का. पाटील यांची राजकारणातील सक्रिय सहभागाची ही पहिली घटना.

काँग्रेस नेते विठ्ठलभाई पटेल त्यांचे गुरु

त्यानंतर स. का. पाटील पुन्हा मालवणला गेले. तिथे त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी शाळा उभ्या केल्या.  चार ते पाच शाळा सुरु करुन शिक्षणाचं कार्य सुरू केले. पुढे पुन्हा मुंबईत आले. असहकार चळवळीसाठी कॉलेज सोडणाऱ्या पहिल्या काही विद्यार्थ्यांपैकी ते एक असल्यानं तत्कालीन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची संधी त्यांना लाभली. विठ्ठलभाई पटेल यांची भेट इथंच झाली.

विठ्ठलभाई पटेल यांना स. का. पाटील यांनी पुढे कायमच गुरुस्थानी मानलं. आपल्या आत्मकथेत स. का. पाटील विठ्ठलभाई पटेलांचा आदरानं उल्लेख करतात आणि गुरुच्या जागी त्यांना मानत असल्याचंही नमूद करतात. विठ्ठलभाई पटेल म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे बंधू.

काँग्रसेमध्ये प्रवेश

पाटील यांनी लंडनमधून पत्रकारिका पदवी घेतली. हे शिक्षण घेण्यासाठी महात्मा गांधीं यांची मोठी मदत घेतली. त्यांनी आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने समाजातील लोकांनी त्यांच्यासाठी निधी उभा केला होता. पदवी घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारिता सुरू केली. मात्र तेव्हाच महाराष्ट्र लढ्यासाठी स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली होती. स्वातंत्र्य चळवळीसाठी स. का. पाटील यांनी पत्रकारिता सोडली. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते ते बॉम्बे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बनले.

काँग्रेसमध्ये अनेक पदे भुषवली

त्यानंतर स. का. पाटील हे १९३५ ते १९५२ दरम्यान काँग्रेसचे नगरसेवक होते. तसेच पुढे पालिकेचं महापौरपदही भुषवलं आहे. मरिन लाईन्सवर दिसणारा क्वीन नेक्लेस हा त्यांच्याच काळात बांधण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीत त्यांची भूमिका मोठी चर्चेत आली. मात्र त्यांच्या या भुमिकेबाबत इतिहासात अनेक मते आहेत. यात काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, त्यांची भूमिका महाराष्ट्राच्या विरोधात होती. तर काहींचं म्हणणं आहे की, संयुक्त लढ्यात त्यांची भूमिका महाराष्ट्राच्या बाजुने होती.

संयुक्त महाराष्ट्राबाबत स.क. पाटलांची भूमीका काय होती?

राजकीय इतिहास संशोधक य. दि. फडके त्यांच्या ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या सातव्या खंडात ‘स. का. पाटील यांची मनमानी’ नावानं स्वतंत्र प्रकरण लिहिलं आहे. मुंबई महाराष्ट्राला कधीच मिळणार नाही, असं वक्तव्य संयुक्त लढ्याच्यावेळी स. का. पाटलांनी केलं असल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे. पण यावर स. का. पाटील यांचे नातू सुहास ठाकूर यांनी यांनी हे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. 

मात्र, संयुक्त महाराष्ट्राबाबत स. का. पाटील यांच्या भूमिकेबाबत मतमतांतरी असली, तरी स. का. पाटील हे स्वतंत्र मुंबई राज्यासाठी आग्रही होते, हे निश्चित.

देशाची भाषेच्या आधारावर विभागणी होऊ नये, इतक्याच मताचा मी

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीबाबत स. का. पाटलांनी त्यांच्या आत्मकथेत भाषानिहाय राज्यनिर्मितीच्या प्रकरणात सविस्तर लिहेले आहे.  यशवंतराव चव्हाण द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री असताना, ते स्वतंत्र महाराष्ट्राच्या मागणीकडे झुकलेले पाहायला मिळाले. तेव्हा मी पंतप्रधान पंडित नेहरूंकडे गेलो आणि त्यांना स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या मागणीची व्याप्ती सांगितली. आपण मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईतील आपलं समर्थन गमावून बसू. त्यानंतर पुढे त्यांनी हे चव्हाणांपुढे मांडलं. मग भाषाअधारित राज्यनिर्मितीला होकार दिला.

आत्मकथेत त्यांनी खंतही व्यक्त केली आहे. ते म्हणतात, “संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला मला निमंत्रणही दिलं गेलं नाही. १० मे १९६० रोजी मी अमेरिकेला जाणार होता. पण स्थापना दिनाच्या कार्यक्रमाचं मला निमंत्रणच नसल्यानं १ मे रोजीच गेलो. मला खूप दु:ख झालं होतं.”

तसेच “मी महाराष्ट्राच्या निर्मितीच्या विरोधात कधीच नव्हतो. देशाची भाषेच्या आधारावर विभागणी होऊ नये, इतक्याच मताचा मी होतो.” असा उल्लेखही त्यांनी आत्मकथेत केला आहे. 

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Monsoon Session 2025 | महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा ८ जुलै रोजी सत्कार....

Next Post

Crime | भविष्य सांगण्याच्या बतावणीने तरुणाची अंगठी लंपास, नारायण पेठेतील घटना....