पुणे: गर्दीचा फायदा घेऊन पीएमटी बसमध्ये चढणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या एका सराईताला वानवडी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून साडे तीन लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीविरुद्ध तब्बल २० गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चंद्रकांत राजु जाधव (वय ३१, रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.११) आरोपी जाधव हा वानवडी परिसरातील शिंदेवस्ती येथील कॅनॉलजवळ फिरत होता. तसेच तो नागरिकांकडे सोन्याचे दुकान कुठे आहे, तसेच जून सोने कुठे विकता येईल अशी विचारपूस करीत होता. याबाबत गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना समजले. तसेच त्याच्याकडे संशयित वस्तु असल्याचे देखील पोलिसांना कळाले.
त्यानंतर वानवडी पोलिसांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. तसेच आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तीन लाख ५१ हजार रुपये किमतीच्या चार तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या बांगड्या आढळल्या. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून सोन्याच्या बांगड्या जप्त केल्या आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरीष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने, निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनाजी टोणे, अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, यतीन भोसले, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद, अभिजित चव्हाण, दिपक क्षीरसागर, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपीविरुध्द तब्बल २० गुन्हे दाखल
पोलिसांनी जाधव याच्याकडे चौकशी केली असता पीएमटी बस मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या हातातील बांगड्या चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. अधिक चौकशी केली असता आरोपीविरुद्ध मुंढवा (११), सांगवी, चतु:शृंगी, वानवडी, वाकड (२) आणि निगडी (१) अशा विविध पोलीस ठाण्यांत असे तब्बल २० गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.


