Advertisement

कौमार्य पुन्हा मिळवण्याच्या शस्त्रक्रियेचे फॅड; वर्षाला ६०० ते ८०० शस्त्रक्रिया

सामाजिक दडपण, नैतिकतेचे कोंदण आणि स्वतःचे कौमार्य सिद्ध करण्यासाठी पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ६०० ते ८०० तरुणी ‘हायमेनोप्लास्टी’ ही शस्त्रक्रिया करून घेत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड, पुण्यामध्ये वाढतेय कौमार्य पुन्हा मिळवण्याच्या शस्त्रक्रियेचे फॅड; वर्षाला ६०० ते ८०० शस्त्रक्रिया, २२ ते ४० वर्षे वयाच्या महिलांचा कल अधिक

सामाजिक दडपण, नैतिकतेचे कोंदण आणि स्वतःचे कौमार्य सिद्ध करण्यासाठी पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ६०० ते ८०० तरुणी ‘हायमेनोप्लास्टी’ ही शस्त्रक्रिया करून घेत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

आधुनिक काळातही समाज आणि कुटुंबासह काही प्रकरणात पतीच्या इच्छेसाठीदेखील काही तरुणी कृत्रिम कौमार्य (हायमेनोप्लास्टी) शस्त्रक्रियेकडे वळत आहेत. पूर्वी ही शस्त्रक्रिया फारशी परिचित नव्हती. परंतु गेल्या काही वर्षांत तिच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या या शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

यामागील प्रमुख कारणांमध्ये विवाहपूर्व संबंधांबाबत असलेली पारंपरिक मानसिकता, कौटुंबिक दबाव आणि नवऱ्याची अपेक्षा यांचा समावेश आहे. विशेषतः आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तरुणी या शस्त्रक्रियेची निवड अधिक करतात, असे काही डॉक्टरांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.  

कृत्रिम कौमार्य शस्त्रक्रिया म्हणजे हायमेन रिपेअर सर्जरी. या प्रक्रियेत योनीमध्ये नैसर्गिकरित्या असणारा आणि शरीरसंबंधामुळे तुटणारा पडदा कृत्रिमरित्या पुन्हा तयार केला जाते. त्यामुळे पुढील वेळी शरीरसंबंध होताना तो पहिल्यांदाच होतोय, असा अनुभव मिळतो.

ही प्रक्रिया साधारणतः तीन दिवसांत पूर्ण होते आणि यासाठी अंदाजे ३५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. वास्तवात हा पडदा तुटण्याची विवाहपूर्व शरीरसंबंधाखेरीज अन्य कारणेदेखील असतात. काही वेळेस जन्मतःच हा पडदा नसतो. कधी खेळताना, चालताना, सायकल चालवताना हा तुटू शकतो. मात्र, दर्दैवाने यावरून थेट ‘स्त्री किती शुद्ध आहे,’ याचा निर्णय आजही समाजात केला जात आहे.

या शस्त्रक्रियेसाठी केवळ नवविवाहित महिलाच नव्हे, तर सॉफ्टवेअर इंजिनिअर, मॉल, हॉटेल्स, बँका इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या महिला आणि कॉलेज तरुणीही पुढे येत आहेत. यामध्ये २२ ते ४० वर्षे वयोगटातील महिलांचे प्रमाण अधिक आहे. या प्रक्रियेविषयी अत्यंत गोपनीयता बाळगली जाते. परदेशात जाण्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रातूनदेखील काही महिला पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन ही शस्त्रक्रिया करून घेत आहेत.

एका अनुभवी सर्जनच्या मते, ‘‘समाजात महिलांच्या लैंगिक स्वातंत्र्याला अजूनही पूर्णतः स्वीकारले गेलेले नाही. त्यामुळे विवाहपूर्व संबंध किंवा कौमार्य यासंदर्भात महिलांवरच अपेक्षा आणि मर्यादा लादल्या जातात. हे वास्तव बदलण्यासाठी केवळ वैद्यकीय उपाय नव्हे, तर व्यापक सामाजिक जागृती आणि संवादाची गरज आहे.’’

ही शस्त्रक्रिया प्रामुख्याने खाजगी रुग्णालयात केली जाते. सर्जन सामान्यतः महिलांचा ‘कम्फर्ट’ लक्षात घेऊन शस्त्रक्रिया करतात. बहुतेक शस्त्रक्रिया भूल देऊन केली जाते आणि ही एका दिवसाची  प्रक्रिया असते. काही वेळा रुग्ण दुसऱ्या शहरातून येतात, गोपनीयता राखण्यासाठी वेगळं नाव नोंदवतात आणि डॉक्टरही त्या गोपनीयतेचा आदर राखतात. यामागे आरोग्यापेक्षा अधिक सामाजिक तणाव आणि ‘इमेज’ जपणे ही कारणे असतात.

हायमेनोप्लास्टी ही केवळ शरीराची नव्हे, तर मनाचीही गुंतागुंत आहे. अनेक वेळा महिलांमध्ये या प्रक्रियेबद्दल अपराधी भावना, लाज, द्विधा मनःस्थिती असते. काही महिलांसाठी ती केवळ एक ‘नव्या सुरुवाती’ची संधी असते, पण काहींसाठी ती स्वतःवर केलेली अन्यायाची कबुली असते.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, हायमेनोप्लास्टीसाठी येणाऱ्या महिलांना आधी मानसिक समुपदेशन देणं आवश्यक आहे. काहीजण फक्त ‘क्लोजर’ हवं म्हणून ही सर्जरी करतात. काहींना ‘गिल्ट’मधून बाहेर पडायचं असतं, तर काहींसाठी ती ‘फॉर्मल रिस्टार्ट’ हवा असतो. पण प्रत्येक स्त्रीच्या अनुभवामागे वेगळी कहाणी असते. त्यातून महिलांच्या मनावर खोलवर आघात होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही.

हायमेनोप्लास्टी शस्त्रक्रिया हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक असला तरी यासाठी समाजातील वाढता दबाव नाकारता येत नाही. २२ ते ४० वर्षे वयोगटातील अनेक महिलांना या शस्त्रक्रियेबाबत कुतुहल आहे. डॉक्टर म्हणून मी कोणालाही याबाबत थेट सल्ला देऊ शकत नाही. याचे फायदे कमी आणि साइड इफेक्ट्स जास्त असल्यामुळे काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. परदेशात हे प्रमाण आधीपासूनच अधिक होते, पण आता भारतातही हळूहळू वाढत आहे.

 – डॉ. पंकज सरोदे, स्त्रीरोगज्ज्ञ

शारीरिक, मानसिक आरोग्याचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक

एका अनुभवी सर्जनच्या मते, ‘‘ही शस्त्रक्रिया गेल्या तीस वर्षांपासून उपलब्ध आहे. मात्र अलीकडील काळात त्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. जुन्या विचारांनी अजूनही समाजात स्थान टिकवले असल्यामुळे विवाहपूर्व कौमार्याचे महत्त्व अनेक कुटुंबांमध्ये कायम आहे. त्यामुळे महिलांवर कौटुंबिक आणि सामाजिक दबाव निर्माण होतो. हा दबाव झुगारून देण्याऐवजी अनेक तरुणी कृत्रिम उपायांची निवड करतात.’’

या प्रकरणांमध्ये मानसिक, सामाजिक आणि लैंगिक आरोग्य यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. वैद्यकीय दृष्टिकोनातून ही शस्त्रक्रिया सुरक्षित असली तरी तिच्या मागे असलेल्या मानसिक कारणांची चिकित्सा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जाणीव ठेवूनच असे निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही या सर्जननी लक्षात आणून दिले.

संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक आरोग्य संघटनेचा विरोध

काही देशांमध्ये मात्र ही प्रक्रिया बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे, कारण ती लैंगिक असमानतेला बळ देते. आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक आरोग्य संघटनेने हायमेनोप्लास्टीवर टीका केली आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, हायमेन ही केवळ एक जैविक संरचना असून तिचं कौमार्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे अशा शस्त्रक्रियांना पाठिंबा देणं ही लिंगसमानतेच्या विरोधातली कृती आहे.

शस्त्रक्रिया केवळ खासगी हाॅस्पिटलमध्येच

पुण्यातील हायमेनोप्लास्टीच्या शस्त्रक्रियांबाबत उपलब्ध असलेली माहिती अत्यंत मर्यादित आहे कारण या सर्जरी गोपनीयतेच्या दृष्टीने केवळ खाजगी क्लिनिक आणि हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. त्यामुळे शासकीय स्तरावर याची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही.

राज्यात दरवर्षी साडेतीन ते साडेचार हजार शस्त्रक्रिया

मागील तीन वर्षांत दरवर्षी सुमारे ६०० ते ८०० शस्त्रक्रिया पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात झाल्या आहेत.  या शस्त्रक्रियेचा खर्च २५ हजारांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत आहे. दरम्यान क्लिनिकच्या डेटानुसार, २०२३ मध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील केंद्रात ४०० पेक्षा अधिक महिलांनी हायमेनोप्लास्टी साठी विचारणा केली. यापैकी सुमारे ३०० महिलांनी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केली. राज्यभरात पाहिल्यास महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे साडेतीन ते साडेचार हजार हायमेनोप्लास्टी शस्त्रक्रिया होतात, असा डॉक्टरांचा अंदाज आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Pimpri Chinchwad: वायसीएम रुग्णालयातील इंटरनेट सेवा ठप्प; अ‍ॅडमीट होणाऱ्या रुग्णांना मोठा फटका

Next Post

डांबर खरेदीच्या निविदेला स्थगिती