लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. 1 ऑगस्टला काही मार्ग बंद राहणार आहेत. पुणे शहरात विविध सामाजिक संस्था, स्थानिक मंडळे आणि राजकीय पक्षांच्या वतीने सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी मिरवणुका आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे जेधे चौक ते सारसबागदरम्यानचा बालाजी विश्वनाथ पथ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे
वाहतूक पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहेत. मात्र, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस यांसारख्या अत्यावश्यक सेवा वाहनांना यामध्ये सूट देण्यात आलीय.
तसेच, मिरवणुकीदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी वाहनचालकांनी मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
कोणत्या महामार्गावर वाहतूक बंद आणि पर्यायी मार्ग कोणते?
जेधे चौकातून सारसबागकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
जेधे चौकाकडून सिंहगड रोडला जाण्यासाठी सातारा रोड – व्होल्गा चौक – मित्रमंडळ चौक – सावरकर चौक मार्गे प्रवास करावा.
सिंहगड रोडवरून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक दांडेकर पुल – नाथ पै चौक – ना.सी. फडके चौक – पुरम चौक – टिळक रोड – जेधे चौक या मार्गे वळविण्यात येईल.
जेधे चौकातील वाय-जंक्शन (फ्लायओव्हर) वरून सारसबागकडे प्रवेश बंद राहील.
कात्रजहून येणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनारायण (व्होल्गा चौक) येथून डावीकडे वळावे.
वेगा सेंटर ते सारसबाग ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी बंद असेल.
राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक या मार्गाचा वापर करण्याचा सल्ला.
सावरकर चौक ते पुरम चौक दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद राहील.
नाथ पै चौक – सावरकर चौक – दांडेकर पुल – ना.सी. फडके चौक – कल्पना हॉटेल – टिळक रोड – पुरम चौक मार्गे पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
दांडेकर पुल ते सावरकर चौककडे जाणारी वाहतूक बंद राहील.
दांडेकर पुल आणि सावरकर चौक येथील वाहतूक दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत दुहेरी मार्गाने सुरु ठेवण्यात येईल.
निलायम ब्रिजने सावरकर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना पर्वती गाव मार्गे वळवण्यात येईल.

