IND vs ENG 5th Test Day 2 | भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ६ गडी गमावून २०४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघ अवघ्या२२४ धावांवर आटोपला. भारताने २० धावांच्या आत ४ गडी गमावले.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली नाही. अर्ध्या तासातच पहिला डाव २२४ धावांवर आटोपला. शुक्रवारी खेळाची सुरुवात सहा बाद २०४ धावसंख्येवरून पुढे झाली. त्यावेळी करुण नायर ९८ चेंडूत ५२ धावा आणि वॉशिंग्टन सुंदर ४५ चेंडूत १९ धावा करत खेळत होते.
आज सकाळी जोश टोंगने प्रथम करुण नायरला एलबीडब्ल्यू बाद केले. तो १०९ चेंडूत आठ चौकारांसह ५७ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर गस अॅटकिन्सनने वॉशिंग्टन सुंदरला आपला बळी बनवले. ५५ चेंडूत २६ धावा काढून तो बाद झाला. सातव्या विकेटसाठी दोघांमध्ये ६५ धावांची भागीदारी झाली. यानंतर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा खाते न उघडता बाद झाला. आकाश दीप खाते न उघडता नाबाद राहिला. इंग्लंडकडून गस अॅटकिन्सनने पाच विकेट घेतल्या तर जोश टोंगने तीन विकेट घेतल्या, तर ख्रिस वोक्सने एक यश मिळवले.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पाचवा सामना कालपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु झाला. या मालिकेत सलग पाचव्यांदा नाणेफेकीचा कौल यजमान संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. काल दिवसअखेर भारताच्या ६ गडी बाद २०४ धावा झाल्या होत्या. त्याआधी, यशस्वी जयस्वाल दोन धावा तर केएल राहुल १४ धावा काढून बाद झाला. कर्णधार शुभमन गिल २१ तर साई सुदर्शन ३८ धावा करू शकला. रवींद्र जडेजा नऊ आणि ध्रुव जुरेल १९ धावा काढून बाद झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. सध्या यजमान संघ चालू मालिकेत १-२ ने आघाडीवर आहे.


