पिंपरी – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात यावा. त्यासाठी अण्णाभाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत गुरुवारी (दि.17) केली.
आमदार गोरखे यांनी म्हटले आहे की, अण्णाभाऊ साठे यांनी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्य हे एक प्रभावी माध्यम म्हणून वापरले. त्यांच्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाचा वसा पुढे नेला. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ कलाकृती नव्हत्या, तर सामाजिक जागृतीचे ते एक प्रभावी साधन ठरले. त्यांनी आपल्या साहित्यातून शोषित, वंचित, कामगार आणि शेतकरी यांच्या व्यथा व आकांक्षांना वाचा फोडली.
त्यांना या अतुलनीय योगदानामुळेच त्यांना यापूर्वी साहित्यरत्न, महाराष्ट्र भूषण आणि लोकशाहीर अशा विविध उपाधींनी सन्मानित करण्यात आले आहे. सध्या राज्यात विविध संघटनांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालये आणि तहसील कार्यालये आदी ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, यासाठी आंदोलने सुरू आहेत. या लोकभावनांची दखल घेत विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये ठराव संमत करून केंद्र सरकारकडे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी अधिकृत शिफारस करावी, असे गोरखे यांनी नमूद केले.


