लैंगिक शोषणाविरोधात महिला कुस्तीपटू पुन्हा जंतर मंतरवर
#नवी दिल्ली
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग आणि प्रशिक्षकांवर लैंगिक शोषणाचे आरोप करून रस्त्यावर उतरलेल्या महिला कुस्तीपटूंनी रविवारी पुन्हा नव्याने पोलीस तक्रार करत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केले आहे. ब्रिजभूषण सिंग यांना अटक होईपर्यंत येथून हलणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच चौकशी समितीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
महिला कुस्तीपटू साक्षीसिंग मलिक म्हणाली की, आमच्या तक्रारीवर सरकारकडून मिळणारा प्रतिसाद निराशाजनक आहे. या प्रकरणी नेमलेल्या समितीचा अहवाल अजून जाहीर केलेला नाही. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारी समितीने नोंदवून घेतल्या आहेत. हा अतिशय संवेदनशील विषय असून हा अहवाल जाहीर करावा अशी आमची मागणी आहे. तक्रार करणारी एक खेळाडू अल्पवयीन आहे. तक्रार करणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर करू नयेत. मात्र, अहवाल जाहीर कारावा.
ब्रिजभूषण यांना अटक झाल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, असे ज्येष्ठ कुस्तीगीर बजरंग पुनीया याने जाहीर केले. विग्नेश फोगट म्हणाली की, आम्ही सतत प्रयत्न करूनही आम्हाला सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही आता येथेच राहणार आहोत. येथेच जेवण करणार आहोत. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि अन्य संबंधितांशी आम्ही गेले तीन महिने संपर्क साधत आहोत. समितीचे सदस्य आम्हाला प्रतिसाद देत नाहीत, क्रीडा मंत्रालय यावर काही बोलायला तयार नाही. ते आमचा दूरध्वनी स्वीकारत नाहीत. आम्ही देशासाठी पदके मिळवली असून आमच्या आत्मसन्मानासाठी आम्ही कारकीर्द पणाला लावलेली आहे.
खेळाडूंच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी २३ जानेवारील क्रीडा मंत्रालयाने पाच सदस्यांची समिती नेमली आहे. या समितीचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय बॉक्सर मेरी कोम यांच्याकडे असून त्यांना एका महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. नंतर समितीची मुदत दोन आठवड्यांनी वाढवून समितीवर बबिता फोगट यांची नियुक्ती केली होती. समितीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर केला आहे. मात्र, तो जाहीर केलेला नाही. लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध करण्यात महिला कुस्तीपटूंना अपयश आल्याचे सांगण्यात येते.
वृत्तसंस्था