स्वच्छतागृहांसाठी महिलेचे राष्ट्रपतींना पत्र
#चिक्कमंगळुरू
या देशात देवा-धर्माच्या नावाने भांडणे होतात, वाटेल त्या मुद्यावर नेते भांडत बसतात मात्र महिलांना साधे सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध नसतात, ही गंभीर गोष्ट कोणाच्याही लक्षात येत नाही, याकडे लक्ष वेधत कर्नाटकातील एका महिलेने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पात्र पाठवले आहे.
राज्यातील चिक्कमंगळुरू जिल्ह्यात कुठल्याच गावात सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याचा मुद्दा अधोरेखित करत जडेम्मा या भाविक यात्रेकरू असलेल्या महिलेने आपली व्यथा थेट देशाच्या प्रथम नागरिक असणाऱ्या मुर्मू यांच्याकडे मांडली आहे. किमान धार्मिक ठिकाणी, जिथे भाविक हजारोंच्या संख्येने येतात, तिथे तरी महिलांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती जडेम्मा यांनी या पत्राद्वारे केली आहे.
मी हे द्रौपदी मुर्मू यांना सांगू शकते, कारण माझ्यासारख्या महिलांसाठी त्या प्रेणास्थान आहेत. माझ्यासारख्या हजारो महिलांची वेदना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचवणे हा माझ्या पत्राचा मुख्य हेतू आहे. द्रौपदी मुर्मू महिला आहेत, किमान त्या तरी माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांची वेदना लक्षात घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी मी बाबा बुदानगिरी दत्त पीठ मुल्लायनगरी आणि सीतलायनगरी या हिंदू तीर्थस्थळी गेले होते. या तिन्ही ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह नव्हते. अशावेळी महिला भाविकांनी काय करायचे? कुठे जायचे? एकाही ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने महिलांना उघड्यावर जावे लागले, हा त्यांचा अपमान ठरला. शिवाय त्यांना त्यांचा मूलभूत अधिकारही नाकारला गेला. प्रत्येक दिवशी लोक धर्मावरून, देवावरून भांडतात पण मग धार्मिक तीर्थस्थळी महिला भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे कोणालाच कसे वाटत नाही? असा संतप्त सवाल जडेम्मा यांनी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.
तुम्ही स्वतः महिला आहात, तुम्हाला महिलांच्या वेदना कळातील, या आशेने मी हे लिहीत आहे. लाखो भाविक ज्या धार्मिक स्थळी भेट देतात तिथे सार्वजनिक स्वच्छतागृह नसणे हे भारतीय राज्यघटनेतील कलम १९ आणि २४ चे उल्लंघन असल्याचा दाखलाही त्यांनी पत्रात दिला आहे. भारतात जगभरातील सर्वात जास्त मधुमेहाचे रुग्ण आहेत, त्यामुळे या नागरिकांना पायाभूत सुविधा मिळणे हा त्यांचा पायाभूत हक्क नाही का, असा सवाल विचारत जडेम्मा यांनी, कर्नाटकातील धार्मिक स्थळी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश देण्याची विनंती मुर्मू यांना केली आहे.