सात महिन्यांमध्ये २५ तरुणांशी लग्न करून त्यांना लुटणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. मागच्या सात महिन्यांत तिने २५ जणांशी लग्न करून त्यांना लुटून पोबारा केल्याचा आरोप तिच्यावर आहे. हे सगळे पुरुष विविध राज्यांमधले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अनुराधा पासवान नावाच्या तरुणीने २५ जणांशी मागच्या सात महिन्यांत लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लग्न करून ही तरुणी त्या तरुणांची फसवणूक करत होती. त्यांना लुटलं की, पुन्हा दुसऱ्या लग्नासाठी पोबारा करत होती. भोपाळमधून अनुराधाला अटक करण्यात आली आहे. अनुराधा ही एका मोठ्या टोळीचा भाग आहे. ही टोळी अशा तरुणांना हेरते जे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत. लग्नानंतर अनुराधा त्यांच्या घरातले पैसे, दागने, मौल्यवान वस्तू घेऊन पळून जात होती. अनुराधाची मोडस ऑपरेंडी सारखीच होती. लग्नानंतर ती तरुणाबरोबर त्याच्या घरात प्रवेश करायची. काही दिवस त्याच्या बरोबर थांबायची. रात्र झाली की अंधाराचा फायदा घेऊन सोने, रोख पैसे, इलेक्ट्रॉनिक साहित्य हे सगळे घेऊन पळून जायची. तिला भोपाळमधून अटक कऱण्यात आली. तपास अधिकारी मीठालाल यांनी ही माहिती दिली आहे.
असा उघड झाला फसवणुकीचा प्रकार
सवाई माधेपूर येथील विष्णू शर्मा नावाच्या तरुणाने ३ मे रोजी या प्रकरणी तक्रार दिली. विष्णूने दिलेल्या माहितीनुसार त्याने पप्पू आणि सुनीता या दोन एजंट्सना दोन लाख रुपये दिले आणि लग्नासाठी चांगली मुलगी शोधून आणा असं सांगितलं. त्यानंतर अनुराधाचे आणि विष्णूचे लग्न झाले. २० एप्रिलला दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर काही दिवसांतच विष्णूच्या घरातल्या वस्तू, पैसे, दागिने हे घेऊन अनुराधाने पोबारा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुराधा ही उत्तर प्रदेशातील महाराजगंज या ठिकाणी एका रुग्णालयात काम करत होती. घरगुती भांडणानंतर ती पतीपासून वेगळी राहू लागली. त्यानंतर ती भोपाळला आली.
भोपाळला आल्यानंतर लग्नाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीत ती सहभागी झाली. स्थानिक एजंटच्या माध्यमातून ती तरुणांशी लग्न करायची. लग्नानंतर एक किंवा दोन आठवड्यांतच घरातल्या वस्तू, पैसे, दागिने हे सगळे घेऊन पसार व्हायची. पोलिसांनी अनुराधाला अटक करण्यासाठी सापळा रचला. एका पोलीस हवालदाराला साध्या वेशात एजंटकडे पाठवले आणि 'लग्नासाठी मुलगी दाखव' असे त्या हवालदाराने एजंटला सांगितले. एजंटने अनुराधाचा फोटो दाखवला त्यानंतर पोलीस हवालदाराने तिच्याशी लग्न करायची तयारी दर्शवली. त्यानंतर व्यवस्थित सापळा रचून तिला अटक करण्यात आली. या घटनेची पुढील चौकशी सुरु आहे. या टोळीत आणखी कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.