Brijbhushan : ब्रिजभूषणविरुद्ध अखेर तक्रार दाखल करणार

भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी मोलाची कामगिरी करत पदके मिळवून देणारे कुस्तीगीर सध्या आंदोलन करण्यासाठी जंतर मंतरवर बसले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 29 Apr 2023
  • 11:24 am
ब्रिजभूषणविरुद्ध अखेर तक्रार दाखल करणार

ब्रिजभूषणविरुद्ध अखेर तक्रार दाखल करणार

कुस्तीगीरांच्या लैंगिक शोषणप्रकरणी पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात माहिती

#नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी मोलाची कामगिरी करत पदके मिळवून देणारे कुस्तीगीर सध्या आंदोलन करण्यासाठी जंतर मंतरवर बसले आहेत. ब्रिजभूषण सिंग आणि राष्ट्रीय प्रशिक्षकांविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप त्यांनी केला असून त्याच्या चौकशीसाठी एक तपास समिती नेमली आहे.   

२६ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांनी असे सांगितले होते की कुस्तीगीरांनी केलेल्या आरोपानुसार एफआयआर दाखल करण्यापूर्वी प्राथमिक चौकशी करण्याची गरज आहे. तक्रार करणाऱ्या खेळाडूंतील एका अल्पवयीन खेळाडूने आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने याचीही दखल घेऊन चौकशी करण्याचा आदेश दिला होता. तसेच २१ एप्रिलला पोलिसांत तक्रार करणाऱ्या सहा कुस्तीगीरांच्या जीवालाही धोका होऊ शकतो, ही शक्यता ध्यानी घेऊन चौकशीचा आदेश दिला होता.

फिर्यादीची बाजू मांडताना ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल म्हणाले की, ब्रिज भूषणसिंग यांच्यावर ४० खटले दाखल झालेले असल्याने आम्हाला फिर्यादीची सुरक्षा आणि संरक्षण या दोन्ही बाबतीत काळजी वाटते.   

ब्रिज भूषण सिंग यांच्याविरूद्ध गेल्या चार महिन्यांत लैंगिक शोषणाचा झालेला हा दुसरा आरोप आहे. गेल्या जानेवारीत कुस्तीगीरांना लैंगिक शोषणाचा आरोप करत निदर्शने केली होती. या आरोपांची चौकशी करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर ही निदर्शने मागे घेतली गेली. सरकारने खेळाडूंना दिलेले कोणतेही आश्वासन पाळले गेले नसल्याचा आरोप करत या खेळाडूंनी एप्रिलमध्ये जंतर-मंतरवर पुन्हा निदर्शने केली. या वेळी त्यांनी ब्रिजभूषण यांना या प्रकरणी शिक्षा करण्याची मागणी केली. 

... मृत्युने बाहुपाशात घ्यावे-ब्रिजभूषण 

सहा वेळा संसदेवर निवडून आलेले ब्रिजभूषण सिंग या वेळी कैसरगंज मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांनी एक व्हीडीओ प्रसिद्धीस देऊन आपल्यावरील सारे आरोप पेटाळून लावले आहेत. या व्हीडीओत ते म्हणतात की, आयुष्यात आपण काय कमावले आणि काय गमावले याचे आत्मपरीक्षण करतो तेव्हा मला असे जाणवते की आता माझ्यात लढण्याची शक्ती राहिली नाही. जेव्हा आपणाला असहाय्य असल्याची जाणीव होते, तेव्हा मला मृत्यूला सामोरे जावे असे वाटते. कारण, असे असहाय्य आयुष्य जगण्याची माझी इच्छा नाही. त्यावेळी मला मृत्युने मला बाहुपाशात घ्यावे अशीच माझी इच्छा असेल. 

कुस्तीगीर आणि सरकारमधील संघर्षावर अजून काही उत्तर सापडलेले नाही. त्यातच निदर्शने करणाऱ्या कुस्तीगीरांच्या विरोधात ॲथलिट आणि भारतीय ॲथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षा पी.टी.उषा यांनी विरोधी भूमिका घेतलेली आहे. पी.टी.उषा म्हणाल्या की, कुस्तीगिरांनी आपला आवाज उठविण्यासाठी रस्त्यावर उतरण्यापूर्वी त्यांनी काही शिस्त पाळण्याची गरज होती. आपल्यावरील अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या या खेळाडूंनी अन्य खेळाडू याप्रश्नी का शांत आहेत, असा प्रश्न विचारला आहे. यानंतर कपील देव, इरफान पठाण, नीरज चोप्रा यांनी आंदोलक खेळाडूंना पाठिंबा दर्शवला आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest