गलवान खोऱ्यातील शहीद दीपकसिंग यांची पत्नी लष्करात
#नवी दिल्ली
भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात चीन सैनिकांशी झालेल्या झटापटीत शहीद झालेले जवान नाईक दीपकसिंग यांच्या पत्नी लेफ्टनंट रेखा सिंग या शनिवारी लष्करात दाखल झाल्या. त्यांची पूर्व लडाखमधील सीमेवर नियुक्ती झाली आहे.
२९ वर्षांच्या रेखा सिंग यांनी चेन्नईतील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीतील प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांची रितसर निवड झाली आहे. त्यांचे पती दीपकसिंग हे लष्कराच्या वैद्यकीय तुकडीत कार्यरत होते. जखमी जवानांना वैद्यकीय मदत देताना त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडसाबद्दल आणि साहसाबद्दल त्यांना मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले होते. परमवीर आणि महावीरचक्र नंतरचा वीरचक्र हा तिसऱ्या क्रमाकांचा महत्त्वाचा पुरस्कार आहे. गलवान खोऱ्यातील हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. १५ जून २०२० ला झालेली ही उभय देशांतील सर्वाधिक हिंसक चकमक होती. त्यात शस्त्रांचा वापर टाळून केवळ शारीरिक झटापटीवर भर दिला होता. दीपक सिंग यांनी अतिशय धाडसाने आणि शौर्याने विपरीत परिस्थितीत केलेल्या मदतीमुळे ३० भारतीय जवानांचे प्राण वाचले होते.
वृत्तसंस्था