भाजप झिरो झालेले पाहायचे आहे -ममता
#कोलकाता
माध्यमांचा पाठिंबा आणि खोटेपणाच्या भ्रमजालाच्या आधारे भारतीय जनता पक्ष सध्या हिरो झालेला आहे. त्यांना झिरो झालेले मला पाहायचे आहे, असे प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव पश्चिम बंगालच्या भेटीवर असून विरोधी पक्षातील ऐक्याबाबत त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याची भेट घेऊन चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणुका पुढील वर्षी होत असून त्यासाठी विरोधी पक्षांमध्ये एकी घडविण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून झालेल्या भेटीनंतर तीनही नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन आपल्यात झालेली चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगितले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांनी एकत्रितपणे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत आमची चर्चा झाली. यापुढे आम्ही जी काही पावले टाकू ती देशाच्या हितासाठी टाकू. जे आता सत्तेवर आहेत त्यांना देशाच्या कल्याणाचे काही पडलेले नाही. त्यांना केवळ आपली प्रसिद्धी करणे याशिवाय दुसरे काम नाही. त्यांनी देशाच्या विकासासाठी काहीही केलेले नाही.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जयप्रकाश नारायण यांची मोहीम बिहारमधून चालू झाली होती. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक झाली तर ती बिहारमध्ये घ्यावी. या बैठकीतून आपल्याला पुढे कसे जावयाचे आहे ते ठरविता येईल. सर्वात प्रथम आम्ही एकत्र आहोत हा संदेश देशातील जनतेला देणे आवश्यक आहे. एकत्र येण्यामध्ये आमच्या पक्षाला काही समस्या नाही. भारतीय जनता पक्षाला झिरो झालेले मला पाहायचे आहे. केवळ माध्यमांचा पाठिंबा आणि जनतेमध्ये खोटेपणाचे भ्रमजाल पसरून भारतीय जनता पक्ष सध्या हिरो झालेला आहे. आमच्यात कोणतीही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा नाही. आम्ही सारेजण एकत्रितपणे पुढे वाटचाल करू. आम्हा सर्वांना एकत्रित काम करण्याची गरज आहे आणि आमची तशी इच्छा आहे.
विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून नितीशकुमार आणि तेजस्वी यादव लखनौमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भेट घेणार आहेत. यापूर्वी नितीशकुमार यांनी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार म्हणाले होते की, आम्ही शक्य त्या सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वांना एक करून पुढे वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
वृत्तसंस्था