मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, घरे पेटवली
#इंफाळ
गेल्या काही दिवसांपूर्वी उफाळून आलेला वांशिक हिंसाचार मावळण्याची लक्षणे दिसत असताना सोमवारी मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला आहे. इंफाळच्या ईस्ट डिस्ट्रिक्ट भागात जमावानं काही घरे पेटवून दिली आहेत.
हिंसाचारास प्रारंभ झाल्यावर स्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलाांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच संचारबंदीची मुदत वाढवण्यात आली असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
एका वृत्तानुसार, इंफाळच्या अरसन भागात जमावाने काही घरांना आग लावली. तसेच परिसरात जाळपोळ केली. यामुळं इथं आधीच सुरू असलेल्या संचारबंदीच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. आधी सकाळी ६ ते संध्याकाळी ४ पर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. त्यात बदल करून ती आता सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत थिथिल केली आहे. त्याचबरोबर इंटरनेट सेवांवरील बंदी आणखी पाच दिवसांसाठी वाढवली आहे.
सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास इंफाळच्या ईस्ट डिस्ट्रिक्ट भागातील न्यू चेकन बाजार येथे वाद उफाळून आला. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास एका जमावानं काही घरं पेटवून दिली. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांना अटक केली आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या इथल्या हिंसाचारातील मृतांचा अधिकृत आकडा ७४ वर पोहोचला आहे.
यापूर्वी मणिपूरमध्ये आदिवासी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. आठ जिल्ह्यात हिंसक घटना अधिक झाल्या होत्या. त्यामुळे दंगलखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्स जवानांच्या तुकड्या तैनात केल्या होत्या.
मणिपूर उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशात राज्य सरकारला मैतईंना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीवर विचार करण्यास सांगितले होते. मैतई समाजाला एसटी दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या संघटनेचे म्हणणे आहे की, हा केवळ नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील आरक्षणाचा मुद्दा नसून तो वडिलोपार्जित जमीन, संस्कृती आणि अस्मितेचा मुद्दा आहे. म्यानमार आणि शेजारील राज्यांमधून येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांकडून मैतई समुदायाला धोका आहे. याच्या निषेधार्थ ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन ऑफ मणिपूर (एटीएसयूएम) ने 'आदिवासी एकता मार्च' काढला होता. या एकता
मोर्चात हिंसाचार झाला. वृत्तसंस्था