कुस्तीगीरांसाठी उषाही जंतर-मंतरवर
#नवी दिल्ली
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंग यांच्याविरूद्ध सुरू असलेल्या ्# मी टू मोहिमे विरूद्ध टीका करणाऱ्या भारतीय ऑलिम्पिक असोसिशनच्या अध्यक्षा पी.टी.उषा यांनी बुधवारी कुस्ती खेळाडूंची भेट घेतली. गेले काही दिवस लैंगिक शोषणाच्या छळाविरूद्ध जंतर-मंतरवर कुस्ती खेळाडू आंदोलन करत असून त्यांनी ब्रिज भूषण शरण सिंग यांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. खेळाडूंच्या भेटीनंतर उषा यांनी प्रसारमाध्यमांशी कोणताही संवाद साधल्याशिवाय घटनास्थळ सोडले.
यानंतर माध्यमांशी बोलताना कुस्तीगीर बजरंग पुनिया याने उषा यांनी खेळाडूंना मदत करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती दिली. तो या भेटीबाबत म्हणाला की, आपल्या विधानाचा गैर अर्थ काढल्याचे उषा यांनी सागितले. त्या म्हणाल्या की, मी प्रथम खेळाडू असून त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची पदाधिकारी आहे. आपण खेळाडूसोबत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी आमचे प्रश्न सोडविण्याचे आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
उषा यांनी गेल्या महिन्यात आंदोलन करणाऱ्या खेळाडूंवर टीका केली होती. खेळाडू करत असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून त्या चौकशीचा अहवाल येण्याची खेळाडूंनी प्रतीक्षा करायला हवी होती. समितीचा अहवाल हाती येण्यापूर्वी खेळाडूंनी निदर्शने करणे ही बेशिस्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.
खेळाडूंनी रस्त्यावर येऊन निदर्शने करण्याऐवजी चौकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा करायला हवी होती. त्यांनी थेट निदर्शने केल्याने खेळाची आणि देशाची प्रतिमा खराब झाली आहे. हा एक नकारात्मक दृष्टीकोन असल्याचे मतही उषा यांनी मांडले होते. मात्र, खेळाडूंनी उषा यांच्या भूमिकेर टीका करताना त्यांच्या विधानाने आपण दुखावलो असून त्यांनी खेळाडंना पाठिंबा द्यावयास हवा होता, असे मत व्यक्त केले होते.
सत्तेविरूद्ध आवाज उठवणे कठीण-विनेश
दरम्यान, अन्य खेळाडूंच्या बरोबरीने जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या आघाडीच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी सत्तेचा गैरवापर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहणे अवघड असल्याचे मत मांडले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंग आणि प्रशिक्षकांविरूद्ध महिला कुस्ती खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. पत्रकारांशी बोलताना विनेश फोगाट म्हणाल्या की, जंतरमंतरवर निदर्शने सुरू करण्याच्या अगोदर आम्ही प्रथम पदाधिकाऱ्यांना भेटलो होतो. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. तीन-चार महिन्यांपूर्वी या पदाधिकाऱ्यांना भेटून आम्ही महिला कुस्तीगीरांचे कसे लैंगिक शोषण केले जाते, कसा मानसिक त्रास दिला जातो, याची सविस्तर कल्पना पदाधिकाऱ्यांना दिली होती. याबाबत त्यांना अतिशय सविस्तर माहिती उदाहरणांसह दिली होती. यावर जेव्हा काहीही कारवाई झाली नाही, तेव्हा आम्ही धरणे आंदोलन सुरू केले. या प्रकरणी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी करवाई करण्याऐवजी समिती स्थापन करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यावेळी काहीतरी कारवाई करण्याची गरज होती. समिती नेमल्याने काही तरी साध्य होईल अशी आमची अपेक्षा होती.
दरम्यान, ऑलिम्पिक कुस्तीपटूंची निवड करण्याच्या नियमात बदल केल्याच्या निषेधार्थ आम्ही निदर्शने करत असल्याचे ब्रिज भूषण सांगत असल्याच्या वृत्ताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पत्रकारांशी बोलताना समाचार घेतला. तो म्हणाला की, ऑलिम्पिकसाठी कुस्तीपटूंची निवड करण्याच्या नियमात बदल केल्याच्या निषेधार्थ आम्ही निदर्शने करत असल्याचे ब्रिज भूषण शरण सिंग यांचे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही आमच्या लैंगिक आणि मानसिक छळाच्या विरोधात आंदोलन करत आहोत. आमचे आंदोलन ऑलिम्पिक निवडीच्या नियमाबद्दल मुळीच नाही, आमचे आंदोलन हे लैंगिक छळाविरूद्ध आहे.