गोळी घशात अडकून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका चार वर्षांच्या लहान मुलाने दुकानात मिळणारी गोळी खाल्ली. मात्र गोळी घशात अडकल्यामुळे मुलाला श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली आणि तीन तासांच्या जीवन मृत्यूच्या संघर्षानंतर त्याने जीव सोडला.
कानपूरच्या बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (३ नोव्हेंबर) ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, डोळ्याच्या आकाराची दिसणारी फ्रुटोला कँडी नामक गोळी मुलाने खाल्ली होती. मात्र चघळत चघळता ही गोळी त्याच्या थेट घशात गेली. घराजवळील एका दुकानात त्याने ही गोळी विकत घेतली होती. गोळी घशात अडकल्यामुळे मुलाचा दृर्दैवी मृत्यू झाला.
मुलाच्या गळ्यात गोळी अडकल्यानंतर आईने त्याला पाणी प्यायला दिले. ज्यामुळे गोळी आणखी खाली गेली आणि मुलाला श्वास घेणेही कठीण झाले. त्यानंतर कुटुंबियांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र अनेक प्रयत्न करूनही डॉक्टरलाही घशातून गोळी काढता आली नाही. पण कुटुंबियांनी आरोप केला की, दिवाळीमुळे रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नव्हते.