संग्रहित छायाचित्र
लखनौ: हल्ली विवाहपूर्व प्रेमसंबंध लवपून लग्न करण्याचे, लग्नानंतर पुन्हा जुन्या प्रियकर किंवा प्रेयसीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचे, त्यासाठी आपल्या जोडीदाराची फसवणूक करण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथून अशीच एक धक्कादायक घटना उघड झाली आहे.
येथे एका तरुणाने एकाच दिवशी दोन विवाह केल्याचे समोर आले आहे. या तरुणाने सकाळी आपल्या प्रेयसीसोबत कोर्टात जाऊन लग्न केले. त्यानंतर रात्री कुटुंबीयांनी त्याच्यासाठी पसंत केलेल्या तरुणीसोबत विवाह केला. जेव्हा प्रेयसीला या प्रकाराची कुणकुण लागली तेव्हा ती तडक या तरुणाच्या घरी पोहोचली. मात्र या तरुणाच्या कुटुंबीयांनी तिला पळवून लावले. त्यानंतर तिने पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती देताना प्रेयसीने सांगितले की, सदर तरुणाशी माझी भेट चार वर्षांपूर्वी झाली होती. हळूहळू आमच्यामध्ये जवळीक वाढू लागली. तसेच आम्ही मंदिरात जाऊन लग्न केले. त्यानंतर आम्ही 'लिव्ह इन'मध्ये राहू लागलो. या दरम्यान, या तरुणाने दोन वेळा माझा गर्भपात केला. मात्र जेव्हा या तरुणाच्या नातेवाईकांनी त्याचे लग्न दुसरीकडे ठरवले, तेव्हा मला शंका आली. तेव्हा या तरुणाने समजावले की, जर आपण कोर्टात जाऊन लग्न केले, तर कुटुंबीय नाईलाजाने का होईना लग्नाला तयार होतील. तसेच या लग्नासाठी कुटुंबीयांनी ठरवलेल्या लग्नादिवशीचीच तारीख निश्चित करण्यात आली. मात्र या तरुणाने माझ्यासोबत कोर्टात विवाह केल्यानंतर संध्याकाळी कुटुंबीयांनी निश्चित केलेल्या तरुणीसोबत पुन्हा विवाह केला. सदर प्रेयसी पुढे म्हणाली की, जेव्हा मला या लग्नाबाबत समजले, तेव्हा मी तातडीने त्याच्या घरी गेले. मात्र मला अपमानित करून तिथून हाकलून देण्यात आले. त्यानंतर मी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे.