RBI's 535 crore : आरबीआयची ५३५ कोटींची रोकड घेऊन जाणारा ट्रक बंद

चेन्नईतील शहरात सरकारी कार्यपद्धतीचा एक नमुना पाहायला मिळाला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) पैसे घेऊन जाणारा एक ट्रक भररस्त्यात बंद पडला. त्यामुळे या ट्रकच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पथकाची धांदल उडाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 19 May 2023
  • 06:42 pm
आरबीआयची ५३५ कोटींची रोकड घेऊन जाणारा ट्रक बंद

आरबीआयची ५३५ कोटींची रोकड घेऊन जाणारा ट्रक बंद

सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस पथकाची उडाली धांदल

#चेन्नई

चेन्नईतील शहरात सरकारी कार्यपद्धतीचा एक नमुना पाहायला मिळाला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) पैसे घेऊन जाणारा एक ट्रक भररस्त्यात बंद पडला. त्यामुळे या ट्रकच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पथकाची धांदल उडाली.    

तामिळनाडूतील चेन्नईमध्ये ५३५ कोटी रुपये घेऊन जाणारा ट्रक भररस्त्यात बंद पडल्याची घटना समोर आली आहे. संबंधित ट्रक आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेचे पैसे घेऊन जात होता. यावेळी काही तांत्रिक बिघाडामुळे हा ट्रक भररस्त्यात बंद पडला. त्यामुळे या ट्रकबरोबर ५३५ कोटी रुपये घेऊन जाणारा अन्य एक ट्रकही थांबवण्यात आला. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित पैशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस पथकाची मात्र प्रचंड धांदल उडाली.

हा ट्रक बंद पडताच खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पोलिसांना सुरक्षेसाठी पाचारण करण्यात आले. एकूण १०७० कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारे दोन ट्रक अशाप्रकारे चेन्नईच्या रस्त्यावर थांबल्याने चर्चांना उधाण आले होते. संबंधित दोन ट्रक चेन्नईतील तांबरम परिसरात उभे होते. हे दोन्ही ट्रक आरबीआयचे १०७० कोटी रुपये घेऊन चेन्नईवरून विल्लुपूरमकडे जात होते. या दोन ट्रकला १७ पोलिसांची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. संबंधित पैसे जिल्ह्यातील विविध बँकांना दिले जाणार होते, पण चेन्नईहून विल्लुपूरमकडे जात असताना यातील एक ट्रक वाटेतच बंद पडला. ५३५ कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात बंद पडल्याचे समजताच  करोमपेट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही ट्रक चेन्नईतील तांबरम येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिद्धा’ येथे हलवण्यात आले. मेकॅनिक ट्रक दुरुस्त करू शकत नसल्यामुळे संबंधित दोन्ही ट्रक पुन्हा चेन्नईतील रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest