पोटच्या पोरांकडून वृद्ध मातांचा छळ
#नवी दिल्ली
एका सर्वेक्षणानुसार भारतातल्या तब्बल १६ टक्के ज्येष्ठ महिलांना त्यांच्या पोटाच्या मुलांकडूनच छळ, शिवीगाळ आणि अपमानास्पद वागवले जाते. यामध्ये शारीरिक हिंसेची प्रकरणे अधिक असतात. तसेच अपमान आणि मानसिक अपमानाची प्रकरणेही मोठ्या प्रमाणात असतात. 'हेल्पएज इंडिया'ने गुरुवारी संयुक्त राष्ट्रसंघाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात भारतातील १६ टक्के ज्येष्ठ महिलांना त्यांच्या पोटाच्या पोरांकडूनच जाच सहन करावा लागत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
'हेल्पएज इंडिया'ने भारतातल्या ६० ते ९० वर्ष या वयोगटातील ७,९११ महिलांचे सर्वेक्षण केले आहे. ‘वीमेन अँड एजिंग: इनव्हिजिबल ऑर एम्पावर्ड?’ असे शीर्षक या अहवालाला दिले आहे. या सर्वेक्षणात संस्धेने अशा महिलांचा समावेश केला आहे ज्यांचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण झाले आहे. या अभ्यासासाठी संस्थेने देशातल्या २० राज्यांमधील, २ केंद्रशासित प्रदेश आणि ५ मेट्रो शहरांमधील महिलांशी संवाद साधला आहे. तसेच संस्थेने शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांचा यात समावेश केला आहे. या अहवालानुसार, भारतातल्या १६ टक्के वयस्कर महिलांशी दुर्व्यहार केला जातो. यापैकी अर्ध्याहून अधिक महिलांना मारहाण झाली आहे. तर ४६ टक्के महिला अनादर, अपमानित झाल्या आहेत. तर ३१ टक्के महिलांचा मानसिक छळ झाला आहे. या सर्वेक्षणात अशी माहिती समोर आली आहे की, या महिलांचा छळ होत असताना त्यांच्या मुलांनी त्यांची साथ दिली नाही. ४० टक्के महिलांचा छळ करण्यात त्यांची मुलेही सहभागी आहेत. तसेच इतर नातेवाईकांकडून ३१ टक्के महिलांचा छळ झाला आहे.