देशातील एकही ब्राह्मण भारतीय नाही
#पाटणा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त बहुतांश राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधाने होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता बिहारमध्येही हळूहळू वातावरण तापायाला सुरुवात झाली आहे. बिहारमध्ये सध्या जातीनिहाय जनगणनेची जोरदार चर्चा चालू आहे. बिहारप्रमाणेच देशभरात या जनगणनेचे राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस यदुवंशकुमार यादव यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा चालू आहे. त्यांचे हे वक्तव्य व्हायरल होत असून त्यावरून आता पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
यदुवंशकुमार यादव यांनी बिहारच्या सुपौल भागात पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर शनिवारी (२९ एप्रिल) हे वक्तव्य केले आहे. ब्राह्मण हे मूळचे भारतीय नाहीत, ते रशियातून इथे आले आहेत, असा दावा त्यांनी केला असून त्यासाठी डीएनए चाचणीचाही संदर्भ त्यांनी दिला आहे. एकही ब्राह्मण या देशातला नाही.
आपण या देशाचे मूळ निवासी आहोत. ब्राह्मण हे मूळचे रशियन आहेत. त्यांचे डीएनए टेस्टिंग झाले तर हे सहज सिद्ध होईल. एकही ब्राह्मण या देशाचा नाही कारण ते रशियातून इथे आले आणि आपल्याला एकमेकांमध्ये भांडायला लावून आपल्यावर राज्य करत आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे त्यांना रशियातून पळवून लावले गेले तसेच त्यांना आता आपण इथूनही पळवून लावायला हवे, असे आवाहन यदुवंशकुमार यादव यांनी उपस्थितांना केले आहे.
दरम्यान यापूर्वी अनेक वेळा ब्राम्हण जातीला टार्गेट करताना, ते भारतीय नसल्याचे दावे केले गेले आहेत. आर्य आणि द्रविड अशी विभागणी करताना ब्राम्हण हे आर्य असून ते उत्तरेतून भारतात आल्याचे दावे आणि दाखले दिले जातात. विशेषतः दक्षिण भारतात हा विचार सांगितला जातो. दरम्यान बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाच्या आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्याने केलेल्या या विधानापासून संयुक्त जनता दलाने चार हात दूर राहणे पसंत केले आहे.
मग सांदिपनी ऋषी कुठून आले?
यदुवंशकुमार यादव यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानावर भाजपने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे आमदार नीरज कुमार बबलू यांनी यादवांच्या विधानावर टीका करताना, ब्राम्हण या देशाचे मूलनिवासी आहेत. ते सर्वांना संस्कार शिकवतात, धर्माचरण कसे करायचे हे शिकवतात, असे म्हटले आहे. यदुवंश यादवांचे विधान समाजात द्वेष निर्माण करणारे आहे. भगवान श्रीकृष्ण यांचे गुरू सांदीपनी हे काय रशियातून आले होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांत हिंदू धर्माला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून यदुवंशकुमार यादवांचे विधान हा त्या षडयंत्राचाच भाग असल्याचेही नीरज कुमार बबलू म्हणाले आहेत.
अशा नेत्यांवर कायदेशीर कारवाई करा
राष्ट्रीय जनता दलाचे नेते विचार न करता काहीही बोलतात, ज्यामुळे संयुक्त जनता दलाची आणि आघाडी सरकारची बदनामी होत असते. अशा नेत्यांना लालूप्रसाद यादव यांनी बाहेरचा रस्ता दाखवावा. यदुवंश यादवांच्या विधानामुळे आमची प्रतिमा डागाळत असल्याची प्रतिक्रिया संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते अभिषेक कुमार झा यांनी व्यक्त केली आहे. राजदच्या नेत्यांनी केलेले विधान वादग्रस्त आहे. परशुराम रशियातून आले होते की इतर कोणत्या देशातून? फक्त चर्चेत राहण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी अशी विधाने केली जात आहेत. राजदने अशा नेत्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही झा यांनी केली आहे.