भारत हिंदू राष्ट्र नसल्याचे निकालामुळे झाले सिद्ध; अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचे विश्लेषण!

भारतातील जगविख्यात अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे अमर्त्य सेन हे आपल्या परखड मतांसाठी ओळखले जातात. अमर्त्य सेन यांनी भारतातील वास्तवाबाबत अनेकदा मतप्रदर्शन केलेले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवरून त्यांनी सत्ताधारी भाजपला टोला लगावला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Fri, 28 Jun 2024
  • 05:58 pm
National news, Hindu nation

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : भारतातील जगविख्यात अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे अमर्त्य सेन हे आपल्या परखड मतांसाठी ओळखले जातात. अमर्त्य सेन यांनी भारतातील वास्तवाबाबत अनेकदा मतप्रदर्शन केलेले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवरून त्यांनी सत्ताधारी भाजपला टोला लगावला. लोकसभेच्या निकालामुळे भारत हे हिंदू राष्ट्र नाही, हे स्पष्ट झाले आहे, असे विधान त्यांनी केले आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात एक सर्वसमावेशक संविधान असताना आपल्या पुढाऱ्यांनी राजकीय उदारमतवाद दाखवायला हवा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माध्यमांशी बोलताना अमर्त्य सेन यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची कल्पना मला योग्य वाटत नाही. भारत हे हिंदू राष्ट्र नाही, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर काहीतरी बदल होईल, अशी अपेक्षा आपण ठेवतो. गेल्या काही निवडणुकांनंतर देशात काय झाले, हे आपण पाहिले. काही नेत्यांना कायदेशीर प्रक्रियेशिवाय तुरुंगात टाकले जात आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे. हे सर्व थांबायला हवे, अशी अपेक्षा सेन यांनी व्यक्त केली. याबाबतचा दाखला देताना ते म्हणाले की, माझ्या लहानपणी ब्रिटिश राजवटीत मी या गोष्टी पाहिल्या होत्या. न्यायालयीन सुनावणी टाळून नेत्यांना तुरुंगात डांबले जात होते. मी लहान असताना पाहिले की, माझे अनेक नातेवाईक कायदेशीर प्रक्रियेशिवाय तुरुंगात टाकले गेले होते. मला वाटते भारत यापासून कधीतरी मुक्त होईल. काँग्रेस सरकारच्या काळातही हे बदलले नाही, तो त्यांचा दोष होता. पण सध्याच्या सरकारच्या काळात ही पद्धत अधिक प्रचलित झाली आहे, अशा शब्दांत सेन यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली.

देशाची खरी ओळख झाकण्याचा प्रयत्न झाला

नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी भाजपाच्या अयोध्येतील (फैजाबाद) पराभवाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, राम मंदिर निर्माणावर बराच पैसा खर्च करण्यात आला. यातून भारत हे हिंदू राष्ट्र आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या काळातही असा प्रयत्न कधी झाला नाही. भारताची खरी ओळख झाकण्याचा हा प्रयत्न होता, त्यात बदल झाला पाहीजे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest